

मतदानाच्या ४ दिवस आधी ठाकरे गटाला मोठा धक्का
माजी आमदार दगडू सपकाळ यांचा शिंदेसेनेत प्रवेश
मुलीला तिकीट न मिळाल्याने सपकाळ नाराज होते
लालबाग–परळ परिसरात शिंदेसेनेची ताकद वाढली
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. लालबाग, परळमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी आणि माजी आमदार दगडू सपकाळ यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मुलीला तिकीट न दिल्यामुळे सपकाळ नाराज होते.
दगडू सपकाळ हे मुंबईतील शिवडीचे माजी आमदार आहेत. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी होती. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- २०३ मधून त्यांची मुलगी निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. पण शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या मुलीला तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे दगडू सपकाळ हे नाराज होते.
दोन दिवसांपूर्वी दगडू सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी त्यांनी आपण म्हातारे झालो असल्यामुळे पक्षाला आता आपली गरज नसल्याची खंत व्यक्त केली होती. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी आज निर्णय घेत शिंदेसेनेत प्रवेश केला. जुन्या शिवसैनिकाने आणि बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडण्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, 'आजचा दिवस शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे. दगडू सपकाळांचे नेतृत्व दगडासारखे कणखर आहे. शिवसेनेसाठी ज्यांनी साडेतीन वर्षे जेलमध्ये घालवली त्यांची अवहेलना करणं दुर्दैवी आहे. दगडू सपकाळांची शिवसेनेत अवहेलना झाली. कार्यकर्त्याची अवहेलना करणं अत्यंत दुर्देवी आहे. बाळासाहेबांनी हेरलेली माणसं शिवसेना पुढे नेत आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. २०१९ ला या महाराष्ट्रात काय घडलं तेही महाराष्ट्राने पाहिले. २०२२ ला जे घडलं ते महाराष्ट्राने पाहिले. २०१९ ला महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारले नाही. पण २०२२ च्या उठावाला महाराष्ट्राने स्वीकारले. जनतेच्या मनातील निर्णय आम्ही घेत आलोय.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.