लोकसभेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली असतानाच उमेदवारांची निवड आणि जागावाटपावरून राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महायुतीने राज्यात ४५ हून अधिक जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मोठा प्लान आखल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या भाजप नेते तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (ता. ५) शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईत महायुतीतील प्रमुख नेत्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपाबाबत एकमत झाल्याचं कळतंय.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून यातील ३० ते ३२ जागांवर भाजप आपले उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. तर शिंदे गटाला ८ ते १० जागा मिळणार असल्याचं कळतंय. याशिवाय अजित पवार गटाला ४ ते ६ जागा मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सध्या महाराष्ट्र लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीकडे जवळपास ३८ जागा आहेत. यात भाजपचे २३, शिंदे गटाचे १३, अजित पवार गटाचे २ खासदार आहे. त्याचबरोबर अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील भाजपला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात ७० टक्के जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मित्रपक्षाला फक्त जिंकलेल्या आणि खात्रीशीर जिंकून येणाऱ्या जागाच देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या शिंदे गटाचे लोकसभेत १३ खासदार आहेत.
त्यामुळे त्यांना ८ ते १० जागा सोडण्याचा भाजपचा मानस आहे. तर अजित पवार यांच्या गटाकडे फक्त २ खासदार आहेत. त्यांच्यासाठी भाजप लोकसभेच्या ४ ते ६ जागा सोडू शकते. उर्वरित ३२ ते ३५ जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती आहे. 'मिशन ४००'साठी भाजपला कोणतीही जोखीम घ्यायची नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.