मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आज म्हणजेच सोमवारपासून १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. हीच बाब लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली होती. मे महिन्यात धरणांमध्ये अत्यंत कमी पाणीसाठी शिल्लक राहिला होता. त्यामुळे मुंबईत ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातच संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं होतं.
मात्र, जुलै महिना सुरू होताच मुंबईत मुसळधार पावसाला (Mumbai Heavy Rain) सुरुवात झाली. यामुळे सातही धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आजच्या दिवशी सरासरी ७३ टक्के इतका पाणीसाठा जमा झालाय. मुंबईकरांना पुढील २६४ दिवस म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पुरेल इतका हा पाणीसाठा आहे.
सात धरणांपैकी तुळशी, तानसा, विहार, मोडकसागर जलाशय शंभर टक्के भरले आहेत. तर सर्वांत मोठे भातसा धरणही ७० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे मुंबई शहरात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात आजपासून रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर जरा जपूनच करावा, असं आवाहन करण्यात आलंय.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील रविवारपर्यंत ७३ टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. आनंदाची बाब म्हणजे यापैकी ४ धरणे काठोकाठ भरली आहेत. महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय रद्द केल्यानंतर टोकाच्या वस्त्या, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.