Summary -
पुणे मेट्रोच्या दोन नवीन मार्गाला राज्य सरकारकडून मंजूर
लोणी काळभोर आणि सासवड रोडकडे मेट्रो विस्तारामुळे कोंडी कमी होण्याची शक्यता
प्रकल्पांची एकूण लांबी १५.५ किमी आणि १४ स्टेशन प्रस्तावित
एकत्रित प्रोजेक्ट खर्च ५,७०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील मेट्रोचं जाळं आणखी वाढणार आहे. राज्य सरकारने पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आणखी दोन मेट्रो मार्गाला राज्य सरकारची मंजुरी दिली आहे. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड या मेट्रो मार्गिकांना राज्य सरकारने मंजुरी दिली. आता लवकरच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात दोन मेट्रो मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ मधील महत्त्वाकांक्षी खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मार्गाच्या दोन उपमार्गीकांना राज्य शासनाने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली आहे. त्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दरम्यान मेट्रो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून पुणेकरांचा प्रवास जलद होण्याची शक्यता आहे.
मेट्रोचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी आणि सासवड यासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या परिसरामध्ये नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होईल. या दोन्ही मेट्रो मार्गावर ३ डब्याची मेट्रो रेल गाडी धावणार असून सुमारे ९७५ प्रवासी क्षमता असणार आहे. साधारणपणे प्रकल्पाचे काम चालू झाल्यापासून ४ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो प्रकल्पाची वैशिष्टे म्हणजे या मेट्रो मार्गाची लांबी ११ किलोमीटर असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १० स्थानके असणार आहेत. या प्रोजेक्टसाठी एकूण १६.३१ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण ४ हजार १५२ कोटी रुपये इतकी खर्च येण्याची शक्यता आहे.
हडपसर ते सासवड रोड मेट्रो प्रकल्पाची वैशिष्टे म्हणजे या मेट्रो मार्गाची लांबी ५.५ किलोमीटर असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण ४ स्थानके असणार आहेत. या प्रोजेक्टसाठी एकूण ०.८ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. या प्रोजेक्टसाठी एकूण १ हजार ५५२ कोटी रुपये इतकी खर्च येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.