
Bharat Bandh : केंद्रीय कामगार संघटनांनी ९ जुलै बुधवारी देशव्यापी भारत बंदची हाक देली आहे.. यात २५ कोटींपेक्षा जास्त कामगार सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी दहा प्रमुख कामगार संघटना आणि त्यांच्या संलग्न संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. कामगार संघटनांनी दिलेल्या भारत बंदमुळे अनेक शहरांमध्ये प्रमुख सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय येणार असल्याचे म्हटले जात आहे. फोरमने औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रातील कामगारांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
९ जुलै रोजी मुंबईत काय बंद राहणार? काय सुरु असणार?
बँका आणि विमा सेवा
भारत बंदमुळे मुंबईतील बँकिंग कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक बँक कर्मचारी संघटनांनी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवा उपलब्ध नसतील किंवा सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. विमा कंपन्यांमधील कर्मचारी देखील संपात सामील होऊ शकतात.
टपाल सेवा आणि सरकारी कार्यालये
टपाल कर्मचारी देखील भारत बंद संपामध्ये सहभागी होऊ शकतात. यामुळे टपाल सेवा विस्कळीत होऊ शकते. सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली नसली तरी, संपामुळे कर्मचारी अनुपस्थित राहिल्यामुळे कामकाज मंदावू शकते.
वीज पुरवठा आणि सार्वजनिक सेवा
संपूर्ण भारतातील २७ लाखांहून अधिक वीज कर्मचारी संपात सामील होणार आहेत. त्यामुळे पूर्ण खंडित होण्याची शक्यता नसली तरीही, वीजेशी संबंधित समस्या सोडवण्यात किरकोळ सेवा खंडित होण्याची शक्यता आहे.
लोकल ट्रेन आणि बेस्ट बस
मुंबईतील लोकल ट्रेन आणि बेस्ट बस सेवा नेहमीप्रमाणे सुरु असतील असे म्हटले जात आहे. पण वाहतूक संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दिला, तर परिस्थिती बदलू शकते. सध्यातरी वाहतूक बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
शाळा आणि महाविद्यालये
भारत बंदच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याची कोणतीही सूचना दिलेली नाही. मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये सुरु राहणार आहेत. पण वाहतुकीच्या परिस्थितीवरुन विद्यार्थ्यांची उपस्थिती ठरु शकेल.
खासगी कार्यालये आणि बाजारपेठा
बीकेसी, लोअर परळ आणि अंधेरी येथील खाजगी क्षेत्रातील कार्यालये सुरु राहणार आहेत. खबरदारी म्हणून काही कंपन्यांनी वर्क फॉर्म होमचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. संपादरम्यान दुकाने, बाजारपेठा आणि रेस्टॉरंट्स नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.