
अंबरनाथ पश्चिमेतील जावसई परिसरातील वाघवाडीत राहणारा तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे यांच्या गाईंना रात्री चरण्यासाठी सोडण्यात आले होते. मात्र, रात्री ८ वाजता तुषार लोंढे त्यांच्या गाईंना परत आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तीन गायी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केल्यानंतर अक्षय वाघचौरे यांच्या एका गाईला तीन इसम ब्रेड खाऊ घालत असल्याचे त्यांना दिसले. तातडीने त्यांने अक्षय वाघचौरे यांला फोन करून घटनास्थळी बोलावले. मात्र, तोपर्यंत तीन्ही संशयित इसम घटनास्थळावरून पळून गेले. त्या गाईला गुंगी आलेली असल्याचे दिसून आले, त्यामुळे चोरीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. दोघे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले, पण एकाला पकडण्यात त्यांना यश आले.
तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे यांनी तातडीने अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, तो कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आला होता आणि गोहत्या करण्यासाठी गाय चोरण्याचा त्याचा उद्देश होता. पोलिसांनी आरोपीच्या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्या डिक्कीत बल्ब, ब्रेडचे पाकीट, पाईप, स्क्रू ड्रायव्हर आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांच्या तपासात उघड झाले की, हे आरोपी ब्रेडवर गुंगीचे औषध टाकून गाईला खाऊ घालायचे, त्यामुळे गाय बेशुद्ध पडली की, ती कारमध्ये भरून कत्तलखान्यात नेत तिची हत्या करून विक्री केली जायची.
या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पकडलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी माहिती दिली.
जावसई परिसरात गाईंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक आणि गाईंचे मालकांचा आरोप आहे की, या गाईंची चोरी करून त्यांची गोहत्या केली जात आहे आणि गोमास विक्रीसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाईंच्या मालकांनी आणि स्थानिकांनी या घटनांविरोधात आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन एकत्र येऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.