मुंबई : देशासहित राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसत आहे. स्वातंत्र्यादिनादरम्यान राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नाराजीनाट्य रंगलं. रस्ते बांधणीच्या प्रस्तावावरून वाद रंगल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रस्तावासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आग्रह धरला. तर देवेंद्र फडणवीसांनी या वादात हस्तक्षेप करण्याचे टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीनाट्य रंगल्याची माहिती मिळत आहे. रस्ते बांधणीच्या प्रस्तावाची किंमत वाढल्याने अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला.
या कॅबिनेट बैठकीत अजित पवार म्हणाले की, '६ महिन्यात रस्ते बांधणी प्रस्तावाची किंमत एवढ्या मोठ्या रकमेने कशी वाढली? अशा पद्धतीने प्रस्तावाची किंमत वाढवण्याची खरंच गरज आहे का? असेल तर या पद्धतीने प्रस्ताव मंजूर करायचा का? ऐनवेळी असे प्रस्ताव कसे आणले जाऊ शकतात? मंत्र्यांना आणि संबंधित विभागाला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला नको का? असे अनेक सवाल अजित पवारांनी उपस्थित केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, या वादात हस्तक्षेप करणे देवेंद्र फडणवीस यांनी टाळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यांचे प्रस्ताव रोखले जात असल्याने त्यांच्यात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. कॅबिनेटमध्ये ऐनवेळी आलेल्या प्रस्तावामुळे हा वाद रंगल्याचं बोललं जात आहे. या प्रस्तावाचा अभ्यास करायालाही वेळ मिळत नसल्याचं मंत्र्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अचानक आलेले प्रस्ताव त्यांना मंजूर करावा लागतात. त्यांची अनेक दिवसांपासून खदखद आहे. तसाच प्रकार कालच्या कॅबिनेट बैठकीत झाला.
राज्यातील ६ हजार किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यांनंतर आज अचानक या प्रस्तावात बदल करण्यात आला. ते रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा नवा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे या प्रस्तावाची किंमत वाढली. त्यानंतर अजित पवारांनी यावर आक्षेप घेतला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.