निलंबित PSI प्रमोद चिंतामणीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
६ जणांची एकूण ९३ लाख रुपयांची फसवणूक
‘पैसे डबल, ४% नफा’ अशा आमिषाने लोकांना फसवलं
भोसरी पोलिसांचा पुढील तपास सुरु
जनतेचा रक्षकच नागरिकांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन कोटी रुपयांच्या लाचखोरी प्रकरणात निलंबित असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्या विरोधात आता 'पैसे डबल' करून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. चिंतामणीने तब्बल सहा जणांची ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संतोष बाळकृष्ण तरटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, निलंबित पीएसआय प्रमोद चिंतामणीने लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना '२० महिन्यांत गुंतवलेले पैसे दुप्पट करून देतो' किंवा '४ टक्के नफ्याने देतो' असे आमिष दाखवले. संतोष तरटे यांनी २०२३ मध्ये चिंतामणीला १८ लाख रुपये दिले होते. त्यांना २० महिन्यांनंतर ३६ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चिंतामणीने केवळ १५ लाख ४० हजार रुपये परत केले आणि उर्वरित २० लाख ६० हजार रुपये परत केले नाहीत. अशाच प्रकारे चिंतामणीने इतर सहा जणांची फसवणूक केली.
आनंद पिंगळे ४० लाख
शांताराम भोंडवे ५ लाख
गणेश खारगे ५ लाख
बिस्मिलाह शेख १० लाख
शीतल पाटील ५ लाख
बापूसाहेब खेंगरे ५ लाख
या आधी देखील बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामीनासाठी सकारात्मक उत्तर देण्यासाठी चिंतामणीने २ कोटी रुपयांची लाच मागितली होती. या मधील ५० लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले होते. दोन कोटींच्या लाच प्रकरणात अडकलेल्या प्रमोद चिंतामणीचे हे नवीन 'प्रताप' समोर आल्यामुळे भोसरी पोलिसांनी आणखी काही फसवणुकीची प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.