पायलटने कामाचे तास संपल्याने फ्लाइटसाठी नकार दिला
पुणे–दिल्ली व पुणे–अमृतसर विमानं तीन तासांपेक्षा जास्त विलंबित
प्रवाशांचा विमानतळावर गोंधळ
नवीन नियमानुसार — दिवसात १० तास मर्यादा, ४८ तास साप्ताहिक विश्रांती
विमानसेवा आणि प्रवाशांमध्ये नियमांमुळे संघर्ष
सागर आव्हाड, पुणे
पुण्यात दोन वैमानिकांनी "माझ्या कामाचे तास संपले आहे,मी पुढील उड्डाण करणार नाही" असे सांगून उड्डाणास नकार दिला. परिणामी पुणे - दिल्ली व पुणे - अमृतसर विमानाला तीन तासापेक्षा अधिक विलंब झाला. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर संबंधित विमान कंपनीने अन्य वैमानिकाचा शोध घेतला. वैमानिक आल्यानंतर पुणे विमानतळावर वैमानिकाच्या प्रतीक्षेत असलेल्या विमानांचे अखेर उड्डाण झाले. दरम्यान विमानाला उशीर झाल्याने विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पुणे विमानतळाच्या सकाळच्या सत्रात पुणे - दिल्ली विमानाला वारंवार उशीर होत आहे. मंगळवारी मात्र इंडिगोचे पुणे - दिल्ली (६इ२२८५)या विमानाचे सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण अपेक्षित होते.मात्र या विमानाच्या वैमानिकाने 'फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन्स' (एफडीटीएल) च्या नियमांचे पालन करीत दिल्लीसाठी उड्डाण करण्यास नकार दिला. विमानाला उशीर होत असल्याने प्रवाशांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अर्धा एक तासात वैमानिकाची उपलब्धता झाली. मात्र पुणे विमानतळावर नोटम (नोटीस टू एअरमेन) सुरु झाले. त्यामुळे नागरी विमानांची वाहतूक साडे अकरा पर्यंत बंद झाली. ११ वाजून ४० मिनिटांनी या विमानाचे दिल्लीसाठी उड्डाण झाले.दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशाचे तीन तास खोळंबा झाला.
पुणे - अमृतसर इंडिगोच्या (६इ - ७२१ ) या विमानाचे उड्डाण पुण्याहून मध्यरात्री २ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण नियोजित होते. मात्र या विमानाच्या वैमानिकाने देखील कामाचे तास संपले असून 'फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन्स' (FDTL) चा दाखला देत अमृतसरला जाण्यास नकार दिला. या विमानासाठी प्रवासी रात्रीच्या १२ च्या सुमारासच दाखल झाले होते. सकाळी साडे सहाच्या सुमारास दुसरा वैमानिक उपलब्ध झाल्यावर या विमानाचे अमृतसरला उड्डाण झाले. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला.
वैमानिकांना थकवा येऊ नये व विमानांची वाहतूक सुरक्षित व्हावी या करिता १ नोव्हेंबर पासून डीजीसीएने नवीन नियम लागू केले आहेत.
दिवसातील कालावधी : १० तास
रात्रीच्या उड्डाणांसाठी कठोर नियम करण्यात आले. रात्री २ ते सकाळी ६ पर्यंत हा काळ 'विंडो ऑफ सर्कॅडियन लो' मानला जातो. यावेळेत मानवी शरीराची नैसर्गिक सतर्कता सर्वात कमी असते. म्हणून रात्रीच्या वेळी होणाऱ्या लँडिंगची संख्या कमी केली. पूर्वी सहा होती आता दोन लँडिंग पर्यंत बंधन घालण्यात आले.
सलग रात्रीच्या ड्युटीची संख्या कमी करण्यात आली आहे.
साप्ताहिक विश्रांती पूर्वी ३६ तास आता ४८ तास.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.