सचिन जाधव, पुणे
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येतील या सोहळ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याआधीच राजकारण सुरु झालं आहे. या मंदिरावरून आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. ' राम मंदिर बनवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता, भाजपचा नाही, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते पुण्यातील सभेत बोलत होते. (Latest Marathi News)
आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातील सणस मैदान येथे पुणे युवाखेळ समिट २०२४ साठी हजेरी लावली. त्यानंतर आयोजित सभेत ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, 'गेल्या 2वर्षांत पुण्यात आलं की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळतो. जेव्हा जेव्हा मला वाटतं की मला टॉनिक हवं आहे, तेव्हा मी इथं येतो. ज्या पुण्यात माझ्या आजोबांचा जन्म झाला. ते स्थळ म्हणजे नातूबाग आहे. मी देखील त्यांचा नातू हा योगायोग आहे. 2024 मध्ये आपण गोल्ड मेडलच जिंकणार आहे. प्रथम क्रमांकावर आपला पक्ष येणार आहे. हे भ्रष्टाचारी खोके सरकार, अवकाळी पावसासारखं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'आम्ही पुण्यात येणाऱ्या वेदांता कंपनीला शेवटपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न केला. या प्रकल्पामुळे मोठा रोजगार मिळाला असता. सरकार बदलून खोके सरकार आलं आणि ही कंपनी गुजरातला गेली. या सरकारने त्या कंपनीला गुजरातला जा, असं सांगितलं. नागपूरमध्ये येणारी एअर बस कंपनी गुजरातमध्ये पाठवली. संभाजी नगरमध्ये येणारा उद्योग गुजरातला पाठवला. एकूण 5 कंपन्यासह फिल्म फेअर अॅवार्डही गुजरातला नेला. वर्ल्डकप नेला. शेवटची फायनल वानखेडेवर झाली, असती तर आपण जिंकलो असतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
'गेल्या वर्षी 2 दिवसात दावोसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झाले. आता 50 लोक घेऊन गेले, मुख्यमंत्र्यांना 50चा आकडा खूपच आवडतो. यांनी सुट्ट्यात मज्जा केली. तुम्ही राज्यात नेमकं काय आणलं ते सांगा. पुण्यातले दोन विमानतळ यांनी रद्द केले. आज 4 महिने झाले, नवीन इमारत तयार आहे. पण उदघाटन झालं नाही, कारण नवं विमानतळ सुरू झालं नाही. अनेक प्रकल्प तयार आहेत, पण या खोके सरकारला उदघाटन करायला वेळ नाही. कारण VIPची तारीख मिळत नाही, असा टोला ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
'कोव्हिडमध्ये आपण काम केलं. सगळ्यांना सुखरूप ठेवलं हे आपलं हिंदुत्व आहे. आज महिलांवर अत्याचार होतात, आता माझ्या भगिनी सुरक्षित नाहीत. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वात महिलांचा मान राखलाच गेला पाहिजे. जे महिलांना त्रास देत आहे, त्याला फासावर चढवायला पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
'आम्ही नक्की अयोध्येला जाणार आहोत. आमचं हिंदुत्व मनात राम आणि हाताला काम असं आहे. मंदिर बनवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता, भाजपचा नाही. 2024 ला कुणाला निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.