चेतन व्यास, वर्धा
पाटबंधारे विभागाच्या पूर क्षेत्र सर्वेक्षणात वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव, नाचणगाव आणि गुंजखेडा या तीन गावांचा ८० टक्के भाग बुडीत क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे अनेक ठिकाणचे बांधकाम बंद झाले होते. तर काही भागात निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे बांधकामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. अखेर आमदार रणजित कांबळे यांनी पुढाकार घेत पाटबंधारे विभागाला आपली चूक सुधारवायला लावली. नव्याने सर्वेक्षण करुन तब्बल एका वर्षानंतर गावकऱ्यांची या समस्येपासून सुटका झाली आहे. (Latest Marathi News)
वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज, लोअर वर्धा आणि अप्पर वर्धा ही धरणं आहेत. शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून पूर नियंत्रण रेषेचे सर्वेक्षण २०२२ मध्ये करण्यात आलं. यात सर्वेक्षणात पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा येथील ८० टक्के क्षेत्र बुडीत क्षेत्रात समाविष्ट केला होता.
सर्वेक्षणानुसार या तिन्ही गावांची रेड झोन आणि ब्ल्यू झोनमध्ये विभागणी केली होती. रेड झोनमध्ये कोणत्याही बांधकामासाठी पाया १० फूट उंच करावा लागतो. तर ब्ल्यू झोनमधील बांधकामावर बंदी घालण्यात आली होती. या सर्वेक्षणाला अंतिम स्वरुप देताना पाटबंधारे विभागाने प्रशासन व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नव्हते.
पाटबंधारे विभागाने केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाची माहिती आमदार रणजित कांबळे यांना समजताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेत हा सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. तिन्ही गावातील नागरिकांची बुडित क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी २०२२ पासून आतापर्यंत जवळपास ४० हून अधिक बैठका आमदार कांबळे यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतल्या.
यामध्ये जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे नागपूर अधीक्षक अभियंता, न.प. मुख्याधिकारी पुलगाव, वर्धा पाटबंधारे विभागाचे अधिकारी, नगर नरचनाकार विभागाला बोलावण्यात आले. त्यानंतर पुरनियंत्रण रेषेचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. पूरक्षेत्राचा नवीन सुधारित नकाशा नगर पालिकेला प्राप्त होताच नगरपालिकेने पुलगाव वासियांना नव्याने जाहीरनामा काढून दिलासा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'पुलगाव येथे अजूनही सीएडीच्या दोन हजार यार्डची समस्या कायम आहे. अशातच चुकीच्या सर्वेक्षणामुळे तीन गावातील नागरिकांची समस्या तसेच बांधकामे होत नसल्याने फटका बसत होता. यामुळे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात आले व नवीन पूरनियंत्रण रेषा निर्धारित करण्यात आली. यामुळे आता नागरिकांना होणारी अडचण दूर झाली आहे, असं आमदार रणजित कांबळे यांनी सांगितलंय.
'पहिल्या सर्वेक्षणाबाबत मला माहिती नाही. मात्र, पहिल्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणातील क्षेत्राचा बुडीत क्षेत्रात समावेश केला होता. नवीन सर्वेक्षणात बुडीतक्षेत्र कमी केले आहे. नव्याने आम्ही केलेले सर्वेक्षण जमिनीच्या पातळीवर केले आहे. अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे प्रकल्प अभियंता राजेश शर्मा यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.