चेतन व्यास, साम टिव्ही वर्धा
Wardha News : तुम्ही मोबाईल अँप किंवा व्हाट्स अँप, फेसबुकवर आलेल्या लिंकच्या मदतीने ऑनलाईन कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर आताच सावध व्हा. कारण, कर्ज घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी (Wardha Crime) नाहक त्रास देऊन धमक्या देण्याचे तसेच बदनामी करण्याचे प्रकार सुरू केले आहे. याबाबतच्या तक्रारी देखील सायबर सेलकडे प्राप्त होवू लागल्या आहेत. यात प्रामुख्याने चायनीज अँप डाऊनलोड करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वर्धा (Wardha) सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Wardha News Today)
पैशाची गरज असते तेव्हा आधी फक्त बॅंक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच कर्ज मिळत असे. पण, सध्या मोबाईलच्या माध्यमातून एका क्लिकवर झटपट कर्ज मिळत आहे. लगेच कर्ज मिळत असल्याने कर्ज घेणारे त्या अँप किंवा लिंकची फारशी माहितीही घेत नाहीत. एका क्लिकवर आधार कार्डवर कर्ज मिळत असल्याने या माहितीचा गैरवापर करुन आर्थिकदृष्ट्या फसवले जात आहे.
मोबाईल अँपच्या सर्व नोटीफिकेशनला परवानगी दिल्या जात असल्याने मोबाईलमधील सर्व माहिती चोरीला जाते. कर्ज वेळेत न फेडल्यास या कंपन्या ग्राहकांचा प्रचंड मानसिक छळ करतात. या छळातून सुटका करुन घेण्यासाठी काही जण आपले जीवनही संपवत आहे. (Wardha News Today Marathi)
या मोबाइल अँप किंवा लिंकवर क्लिक करताच कर्ज मंजूर होते. कर्जाची रक्कम जमा होताच दिलेल्या मुदतीच्या पूर्वीपासूनच अशा प्रकारे मानसिक त्रास दिला जातो
- कर्ज फेडण्यास उशीर झाल्यास किंवा कर्जाची शेवटची तारीख असते त्या दिवशी सकाळपासूनच अँपच्या कॉल सेंटरमधून कॉल येण्यास सुरुवात होते. धमक्या दिल्या जातात.
- तुम्ही फोन उचलला नाही तर तुमच्या मोबाइल मधून चोरलेल्या डाटाच्या आधारावरून नातेवाईक आणि मित्रांना फोन करुन आता तुम्ही कर्ज फेडा, असे सांगितले जाते तसेच त्यांना शिवीगाळ केली जाते.
- मोबाईलवर खोट्या लीगल नोटीसा पाठविल्या जातात. तसेच कर्ज न फेडल्यास कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली जाते.
- शेवटचा उपाय म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन नातेवाईकांचे, मित्रमंडळीचे फोन नंबर ऍड करतात.
कर्ज घेताना तुम्ही जो फोटो देता तो फोटो तुमच्या नाव आणि पत्त्यासह ग्रुपवर शेअर करत ‘अमुक अमुक व्यक्ती चिटर आहे’ किंवा ही व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली, असे मेसेज टाकतात. अशा प्रकारे तुमची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या देखील केली असून काहींना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
झटपट लोन देण्याच्या नावाखाली तरुण तरुणींना आपल्या जाळ्यात सायबर भामटे ओढत आहेत. मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लीस्ट हॅक करुन कर्ज फेडल्यानंतरही तरुण तरुणींच्या परिचयातील तसेच नातलगांना अश्लिल मेसेज पाठवून त्रास दिला जातो आहे. अशा अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होत आहेत.
व्हॉट्सअँप तसेच फेसबूकवर झटपट लोन बाबत लिंक पाठविली जाते. कर्जाचे आमिष दाखविले जाते. ७ हजार, १० हजार २० हजार झटपट देऊन खात्यात रक्कम जमा केली जाते. मात्र, त्यावर ३५ टक्के व्याज लावून दुप्पट ते तिप्पट पैसे उकळण्याचा प्रकार सुरु आहे. कर्ज न फेडल्यास किंवा उशिर झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीने धमक्याही दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी अशी कुठलीही लिंक डाऊनलोड करु नये, असे आवाहन वर्धा पोलिसांनी केले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.