
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांमध्ये एप्रिल महिन्याला सुरूवात होईल. उन्हाचा तडाखा वाढण्याऐवजी अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, याचा फटका शेतकरीवर्गाला आणि सामान्यांना देखील बसणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली? पावसाने कोणत्या तालुक्याला झोडपलं? पाहा.
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभराच्या उकाड्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज खंडित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग
दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. ऐन उन्हाळ्यात दोडामार्ग तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तिलारी, साटेली-भेडशी गावात जोरदार पाऊस बरसत आहे. गेल्या तासाभरापासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे काही भागात विज पुरवठा खंडीत झाला आहे.
सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातही जोरदार पाऊस बरसत आहे. अवकाळी पावसामुळे आंबा काजूच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
सातारा
सातारा शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरवात केली आहे. काशीळ परिसरातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
सांगली
उन्हाने हैराण झालेल्या सांगली आणि मिरजकरांना पावसामुळे गारवा मिळाला आहे. सायंकाळी ५ च्या दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याचा तडाका सांगली आणि मिरज पूर्व भागाला बसला आहे. पावसामुळे अनेक झाडाच्या फांद्या रस्त्यावर उन्मळून पडल्या आहेत.
कराड
कराड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे उकड्याने हैराण झालेल्या कराडकरांना दिलासा मिळणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मंडईतील भाजी विक्रेत्यांची धावपळ पाहायला मिळाली.
सोलापूर
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला बसला आहे. बार्शी तालुक्यातील माळेगाव शिवारात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुभाष घोडके या शेतकऱ्याची १ हेक्टर द्राक्षबाग आडवी झाली. त्यामुळे साधारण १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.