मुंबई: विधानसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून निवडणुकांआधी आघाडी फुटणार असल्याच्या चर्चांवर आज, शनिवारी प्रमुख नेत्यांनी एकत्रित लढण्याबाबत केलेल्या वक्तव्यानं पडदा पडला. विधानसभा निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत केला. तिन्ही पक्षांची विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठक झाली असून, महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे, अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस या पक्षांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गट,अजित पवार गट यांची महायुती यांच्यात थेट सामना झाला. या लढाईत भक्कम एकजूट दाखवत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकत महायुतीला पराभूत केलं. जनतेने महाविकास आघाडीच्या बाजुने कौल दिला, राज्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी आज मविआने पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. नाशिकमधील काळाराम मंदिरात गेल्यानंतर आपण भाजपमुक्त भारत करायचं आहे, असं म्हटलं होतं. देशातील जनतेने आयोध्या आणि राज्यातील मतदारांनी भाजपविरोधात मतदान केलं. जेथे-जेथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तेथे भाजपने सपाटून मार खाल्ला असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लागवला.
भाजप अजिंक्य आहे,त्यांना कोणी पराभूत करू शकत नाही. असं म्हटलं जात होतं.पण हा फोलपणा आहे राज्यातील जनतेने दाखवून दिला. लोकसभा निवडणूक ही देश आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यानुसारच देशातील आणि राज्यातील जनतेने 'महाविकास आघाडी' आणि 'इंडिया' आघाडीला जो कौल दिलाय. परंतु ही लढाई अजून संपलेली नाहीये, आता सुरू झाली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत ताकदीने लढू असं म्हटलंय.
सरकार टिकेल का?
देशात आता मोदी सरकार नाही तर एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल हे याची खात्री नाही, कारण ही युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, माहिती नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
विधानसभा एकत्र लढवणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस अधिक जागांवर दावा करेल, असं म्हटलं जात होतं. इतकेच नाही तर विधानसभेसाठी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ जागांवर तयारी सुरू केल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं.यामुळे विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडी बिघाडीत होणार असल्याचं म्हटलं जात होतं.
या चर्चांवर आज पडदा पडला. पत्रकाराच्या विधानसभेच्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठकी झालीय झालीय. तिन्ही पक्षासह इतर घटक पक्ष आणि ज्या लोकांना आम्हाला साथ दिली त्या सर्वांनासोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याचं ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.