शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या म्हणजेच बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणाचे आमदार अपात्र होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार रवींद्र वायकर अडचणीत सापडले असून त्यांच्या घरावर मंगळवारी सकाळीच ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे.
त्यामुळे आमदार वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बीडमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ४० वर्षापासून शिवसेनेसोबत निष्ठावंत असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
मंगळवारी ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी अनिल जगताप हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मुंबईला निघण्यापूर्वी जगताप यांनी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे. त्याच्यापाठोपाठ जवळपास ५०० गाड्या कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघाल्या आहेत. अनिल जगताप यांचा बीडमध्ये मोठा दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
आता ते एकनाथ शिंदे यांना साथ देणार असल्याने शिंदे गटात आनंदी आनंद आहे. सुषमा अंधारे यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आपण ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जगताप यांनी जाहीर केलं आहे. एकीकडे आमदार अपात्रतेचा निकाल तोंडावर असताना दोन मोठे धक्के बसल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.