४ वर्षांचा शिवराज ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळला
१२ तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला
घटनेवेळी वडील तेथेच उपस्थित
गावात आणि कुटुंबात शोककळा
सोलापुरातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शीमधील एका गावात ४ वर्षाचा चिमूरडा खेळता खेळता ट्रॅक्टर वर चढला आणि अर पडल्यामुळे ट्रॅक्टरसहित विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवराज शेरखाने असं या चिमुकल्याचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच गुरुवारी बार्शीतील शेळगाव परिसरात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. विहिरीजवळ ट्रॅक्टर उभा ठेवण्यात आला होता. याच वेळी जवळच खेळत असलेला छोटा शिवराज खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून हात लागल्याने गिअर पडला आणि क्षणार्धात ट्रॅक्टर पुढे सरकून विहिरीत कोसळला.
घटनेवेळी चिमुकल्या शिवराजचे वडील तिथेच काम करत होते. मात्र शिवराजने त्यांची नजर चुकवून ट्रॅक्टरवर चढला आणि अनर्थ घडला. या भयावह अपघातानंतर शिवराजच्या वडिलांनी त्याचे प्राण वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. त्यांनी तत्काळ विहिरीजवळ धाव घेत आतमधील परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला. गावातील काही तरुणांनी कसलीही पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शिवराजचा शोध सुरू केला. या वेळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनाही कळवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून अग्निशमन आणि पोलीस पथकाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र विहिरीत खाली अडकलेला ट्रॅक्टर, खोल पाणी आणि चिखल यामुळे बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळे ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी शक्कल लढवून प्रथम विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
सलग १२ तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर अखेर विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात यश आले. पाणी कमी झाल्यावर शिवराजचा मृतदेह विहिरीच्या तळाशी दिसून आला आणि त्याला बाहेर काढण्यात आले. निष्पाप बाळाचा अशाप्रकारे झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.