अक्षय गवळी, अकोला
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील एका गावात ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत अभिजीत तायडे (वर्षे ५) असं या मृतक चिमुकल्याचं नाव आहे. हा चिमुकला पाण्याच्या डबक्यात पडून दगावला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, अनिकेत तायडे हा सकाळपासून बेपत्ता होता. तो बेपत्ता असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मुलाचा शोध घेण्याचं आवाहन या व्हायरल मेसेजमधून करण्यात येत होतं. मात्र, सायंकाळी ४ वाजता त्यांच्याच घराजवळील सांडपाण्यात अनिकेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनब्दा गावातील अभिजीत तायडे कुटुंब रहिवाशी आहेत. अभिजीत तायडे यांना तीन मुले आहेत. त्यांचा मधला मुलगा अनिकेत तायडे हा सकाळी नऊच्या सुमारास अंगणवाडीत जाण्यासाठी निघाला होता. दुपारी बाराच्या सुमारास अनिकेत अंगणवाडी मधून घरी येतो. बराच वेळ झाला अनिकेत घरी परतला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. पुढे मनब्दा गावातील गावकऱ्यांच्या घरोघरी जात प्रत्येकांना मुलाबद्दल विचारणा केली. परंतु त्याचा सुगावा लागला नाही.
अखेर गावातील तरुणांनी अनिकेत बेपत्ता असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. सगळीकडे अनिकेच्या शोधार्थ शोध मोहीम सुरू झाली. बराच वेळ झाला तरी अनिकेचा सुगावा लागत नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. त्यानंतरही गावकऱ्यांकडून अनिकेतचा शोध सुरु होता. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास अनिकेत बाबत धक्कादायक माहिती समोर आली आणि गावात एकच खळबळ उडाली.
अनिकेतच्याच घराशेजारी असलेल्या सांडपाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. तायडे कुटुंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अनिकेतचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळी कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान, ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे अनिकेचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. कारण, तायडे कुटुंबीयांच्या घरासमोर सिमेंटचा काँक्रिटीकरण रस्ता बांधण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे त्यांच्या घरा बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलं होतं. याच सांडपाण्यात बुडून अनिकेतचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची अवस्था पाहता घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे, हा मुलगा सकाळपासूनच बेपत्ता होता. परंतु त्याच्या मृत्यूचं मूळ कारण आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतर समोर येईल. या प्रकरणात तेल्हारा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.