
राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुण्यासह कोकणातही संततधार कोसळत आहे. रत्नागिरीला सकाळपासून पावसाने झोडपून काढलं आहे. मागील २४ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, खेड, राजापूर, लांजा, संगमेश्वर यांसारख्या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी, कोदवली, शास्त्री आणि असावी या प्रमुख नद्या इशारा पातळी ओलांडत असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे.
रत्नागिरीमधील खेडमध्ये सकाळपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदी आता दुथडी वाहत आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली असून, मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे माणगाव रायगड मार्गावर दरड कोसळली आहे. माणगाव रायगड किल्ला मार्गावर घरोशी वाडी, पळस गाव मार्गावर ही दरड कोसळल्याची माहिती आहे. डोंगराचा काही भाग खचल्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दरड कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही.
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली आहे. सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु आहे. महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहे.
राजापूरला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलं. अर्जुना आणि कोदवली नदी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. कोदवली नदी सध्या इशारा पातळीवर असून, राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचे पाणी आलं आहे. राजापूरमधील व्यापाऱ्यांनी त्यांच्या वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. राजापूरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रात्रीपासून रत्नागिरीत पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण 1021.92 मिलीमिटर पाऊस पडला असून, सरासरी 113.54 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लांजा तालुक्यात पडला. लांज्यात 139 मिमी पाऊस पडला आहे. त्यानंतर गुहागर 136.80 मिमी, संगमेश्वर 129.50 मिमी , चिपळूणमध्ये 128 मिमी पाऊस पडला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.