परभणीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीत विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसादरम्यान तालुक्यात अंगावर वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आज दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. (Latest Marathi News)
परभणीच्या गंगाखेड तालु्क्यातील भेंडेवाडी व डोंगरपिंपळा गावात दुर्दैवी घटना घडली आहे. भेंडेवाडी व डोंगरपिंपळा या दोन्ही गावात वीज पडल्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. गंगाखेड तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरु आहे.
परभणीच्या भेंडेवाडी व डोंगरपिंपळा या भागात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. डोंगरपिंपळा या भागात पाऊस सुरू असताना सविता विठ्ठल कतारे (४०) व निकिता विठ्ठल कतारे (१८) या मायलेकींच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी येथे दुपारी चार वाजेच्या दरम्यान वीज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत ओंकार किशन घुगे (१४) याचा जागीच मृत्यू झाला. तसेच गोविंद विनायक घुगे (३०), सुनिता काशिनाथ शेप (४८) , रेणुका काशिनाथ शेप (२७) हे गंभीर जखमी झाले. सदरील घटनेमुळे गंगाखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
तत्पूर्वी, काल गणेश विसर्जनावेळी जुहू चौपाटीवर वीज कोसळण्याची घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास जुहू चौपाटीवर गणपती विसर्जनसाठी तैनात एका १६ वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. हसन युसूफ शेख असे या मुलाचे नाव होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.