भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर :
भाडेकरूंच्या मुजोरीच्या घटना वारंवार समोर येतात. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाडेकरूच्या मुजोरीमुळे वृद्ध दाम्पत्याला चक्क घराबाहेर झोपून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
70 वर्षीय एलिझाबेथ बत्रा या 76 वर्षीय पतीसोबत एन-१ परिसरात राहतात. त्यांची मुलं भारतात नाहीत. त्यापार्श्वभूमीवर 2020 मध्ये त्यांनी घरासमोरची जागा एका भाडेकरूला किराणा दुकानासाठी दिली होती. त्यानुसार रितसर करारही करण्यात आला होता. मात्र 2023 मध्ये त्यांचा भाडेकरार संपला.
एवढंच नाही तर भाडेकरूने दिलेले चेकसुद्धा बाऊन्स झाल्यानं आमचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे भाडेकरूला नोटीस दिली. मात्र मुजोर भाडेकरुने जागा खाली करायला नकार दिला. त्यानंतर वृद्ध जोडप्याने न्यायालयातही धाव घेतली. पोलिसांतही तक्रार केली. पण पोलिसांनी दखल न घेतल्यानं अखेर या दाम्पत्यानं सोमवारी रात्री घराबाहेर झोपून आंदोलन सुरु केलं. यावेळी वृद्ध दांपत्याने आपबिती सांगितलीय.
2020 मध्ये दुकानाचा करार करताना आम्ही पाच वर्षांच्या कराराची मागणी केली होती. कारण एखादा व्यवसायाचं ठिकाण तीन वर्षात बदलणं व्यवसायाच्या दृष्टीने चांगलं नाही. त्यावेळी वृद्ध दांपत्याने कोरोनाचं कारण देत तीन वर्षांचा करार करू असं सांगितलं. तसंच तीन वर्षांनी कराराची मुदत वाढवू असंही म्हटलं होतं. त्यानुसार हा करार करण्यात आला. त्यानंतर तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला. त्यावेळी करारवाढ करण्यास दाम्पत्याने होकार दिला. मात्र त्यानंतर मुदत संपली तरीही मला त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्याने मी दुसऱ्या ठिकाणी शोध सुरु केला.
मला एका ठिकाणी जागा मिळाली आहे. त्यामुळे मी फक्त 11 महिन्यांचा करार करण्याची विनंती केली होती. त्यानंतरही त्यांच्याकडून मला मुदतवाढ देण्यास नकार दिला. तसंच वृद्धत्वाचा फायदा घेत मला त्रास दिला. त्यानंतर मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तसंच हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने मला 11 महिन्यांची मुदत देण्यास मान्यता दिली. मात्र तरीही या वृद्ध दाम्पत्याने दुप्पट भाड्याची मागणी केली.
मी भाडं वाढवून देण्यास तयार असतानाही त्यांनी भाडेकराराशी संबंधित कार्यालयात तक्रार केली. ती तक्रार दाखल करून घेण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र त्यानंतर बेकायदेशीररित्या हे वृद्ध दाम्पत्य सहानुभूती मिळवण्यासाठी आंदोलन करून माझी बदनामी करत असल्याचं मत दुकानदाराने व्यक्त केलं.
वृद्ध दाम्पत्याने झोपून आंदोलन केल्यानं एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समजूत काढत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र वृद्ध दाम्पत्य आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे वृद्ध दाम्पत्यावर आंदोलन करण्याची वेळ येण्याआधीच नियमानुसार पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा सवाल विचारला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.