

बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी गावातील मुलींची कौतुकास्पद कामगिरी
चार सख्ख्या बहिणी मुंबई पोलिस दलात भरती झाल्या
या चारही बहिणी ऊसतोड कामगार हनुमंत चौरे यांच्या मुली आहेत
आर्थिक अडचणी असूनही पालकांनी मुलींना शिक्षण देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण केले
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील ४ सख्ख्या बहिणींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तरुणींची फक्त जिल्हाभर नाही तर संपूर्ण राज्यात चर्चा होत असून त्यांचे कौतुक केले जात आहे. एका ऊसतोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ४ मुली मुंबई पोलिस दलामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण गावाला प्रचंड अभिमान वाटत आहे. संसाधनाची कमतरता असून देखील या मुलींनी जे काही यश मिळवलं आहे त्याचे कौतुक करावे तेवढं थोडंच आहे.
बीड जिल्ह्यातल्या जिवाचीवाडी या गावातील ऊसतोड कामगार हनुमंत चौरे यांच्या चारही मुली मुंबई पोलिस दलात भरती झाल्या आहेत. चार सख्ख्या बहिणी मुंबई पोलिस दलात भरती झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या चार बहिणींनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने असे यश मिळवले आहे की ते संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणास्थान बनले आहे. एका छोट्याच्या गावात राहणाऱ्या या बहिणींनी स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत नोकरी मिळवल्याने आई-वडिलांना प्रचंड अभिमान वाटत आहे.
जिवाचीवाडी हे डोंगरात वसलेले एक खेडेगाव आहे. जिथे ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह सुरक्षेच्या कारणास्तव बालपणातच लावून दिले जातात. तिथे उषा, अर्चना, गितांजली, शितल या चार बहिणींनी वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. त्यांचे आई-वडील आजही ऊस तोडीचे काम करतात. हालाखीची परिस्थिती असताना चारही बहिणींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.
त्यांच्या यशाने गावकरी देखील आनंदी झाले आहेत. आर्थिक अडचणी आणि असंख्य आव्हाने असून देखील हनुमंत चौरे यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले. आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मुलींनी देखील जिद्दीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.