Rarest Snakes : गगनबावडा परिसरात आढळले दोन दुर्मिळ साप; पाहा फोटो

Rhabdops Aquatica Snakes : दाजीपूर-राधानगरी-गगनबावडा परिसर हा याच पश्चिम घाटाचा एक अविभाज्य भाग असून तो विविध जीवजंतू आणि वनस्पतींनी फुललेला आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या सरिसृपांच्या
Rhabdops Aquatica Snakes
Rarest Snakes Saam TV
Published On

रणजीत माजगावकर

भारताला पश्चिम आणि पूर्व घाटांचे अमूल्य देणे लाभले आहे. दोन्ही घाटप्रदेश हे जैवविविधतेने नटले असले तरी पश्चिम घाट हा प्रामुख्याने जैवविविधतेचा केंद्रबिंदू (Biodiversity hotspot) मानला जातो. गुजरातपासून केरळपर्यंत अफाट पसरलेल्या पश्चिम घाटमाथ्याचे भौगोलिकदृष्ट्या उत्तर, मध्य आणि दक्षिण असे ढोबळमानाने विभाग केले जातात.

Rhabdops Aquatica Snakes
Snake Viral Video : बापरे बाप! बिल्डिंगमध्ये घराबाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये शिरला साप; पायात घालताच जे घडलं, ते भयंकरच

दाजीपूर-राधानगरी-गगनबावडा परिसर हा याच पश्चिम घाटाचा एक अविभाज्य भाग असून तो विविध जीवजंतू आणि वनस्पतींनी फुललेला आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या सरिसृपांच्या सुमारे १५६ प्रजातींपैकी ९७ प्रजाती या स्थानिक प्रजाती (endemic) असून त्यापैकी ५ प्रजाती संकटग्रस्त मानल्या जातात.

हा परिसर सापांचे आगर मानला जातो. भुईबावडा घाट परिसरात फिरत असताना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारऱ्या डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील व त्यांचे सहकारी तेजस पाटील यांना पाण्यात एक साप दिसला. डॉ. पाटील यांना प्रथमतः तो पाणदिवड (स्थानिक भाषेत विरोळा/ इरोळा) असेल असे वाटले; पण नंतर जवळून निरीक्षण केल्यावर तो वेगळा साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय, सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचा शांत (docile) स्वभाव! पाणदिवड सापाच्या आक्रमक स्वभावाच्या विपरीत हा साप अतिशय शांत स्वभावाचा दिसला.

या सापाचे प्रोफाईल फोटो घेऊन डॉ. अमित पाटील यांनी ते विख्यात सरिसृपतज्ज्ञ श्री. वरद गिरी यांना पाठविले. त्यांनी या सापाचे नाव ‘ऱ्हॅब्डोप्स अक्वॅटिका’ (Rhabdops aquatica) असल्याचे सांगितले. या सापाचा शोध अगदी अलीकडेच म्हणजे २०१७ साली लागला आहे. याचे अद्याप मराठीमध्ये नामकरण झालेले नाही.

या सापाचा पाठीकडील रंग गडद शेवाळी तपकिरी, तर पोटाचा रंग फिकट पिवळसर (off white) असतो. पाठीकडील भागावर शरीरभर विखुरलेले काळे ठिपके असतात. शक्यतो धबधब्यांच्या परिसरातील उथळ आणि संथ वाहणाऱ्या पाण्यात राहणे हा साप पसंत करतो. हा साप पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती असून, तो बिनविषारी आहे. दाट जंगलातील प्रवाहांजवळील खडकांखाली पाण्यात किंवा क्वचित खडकांवर बसलेला हा आढळून येऊ शकतो. मासे हे त्याचे मुख्य खाद्य आहे.

याशिवाय, डॉ. पाटील यांना करूळ घाट परिसरात ‘कवड्या’ सापांपैकी दुर्मीळ प्रजाती असणाऱ्या ‘त्रावणकोर कवड्या सापा’चेही अस्तित्व आढळून आले आहे. कवड्या हा बिनविषारी साप असून भिंतींवर किंवा उंचावर चढण्याचे विशेष कसब त्याच्या अंगी असते. यांपैकी ‘त्रावणकोर कवड्या’ हा शक्यतो पश्चिम घाटांच्या दक्षिण भागात (दक्षिणेकडील राज्ये) आढळतो.

मात्र, गगनबावडा परिसरात डॉ. पाटील यांना या सापाचे किमान दोनवेळा दर्शन झाले आहे. चकचकीत काळ्या (jet black) किंवा गडद तपकारी रंगाच्या या सापाच्या अंगावर आडवे पिवळे पट्टे असल्याने हा साप अतिशय आकर्षक दिसतो. याचा पोटाकडील भाग हा एकसलग शुभ्र पांढरा असतो. अतिशय चपळ हालचाली करणारा हा साप बिनविषारी आहे. हा रात्री वावरणारा असून, उंच डोंगरांच्या परिसरात व सदाहरित आणि पानझडी अशा दोन्ही प्रकारच्या जंगलांत आढळतो. धोक्याची जाणीव होताच हा साप शरीराची एखाद्या चेंडूप्रमाणे गुंडाळी करतो व त्याआड डोके लपवून घेतो.

पश्चिम घाटात अनेक स्थानिक व काही विलुप्तीच्या मार्गावर असणाऱ्या प्रजाती आहेत. स्थानिक लोक व तरूण अभ्यासकांनी अशा वन्यप्राणी व वनस्पतींच्या प्रजातींचे संरक्षण-संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन डॉ. अमित पाटील यांनी केले आहे.

Rhabdops Aquatica Snakes
Snake in Bigg Boss House: बिग बॉसच्या घरात लांबलचक साप; घरातील स्पर्धकांचा जीव धोक्यात, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com