वेंगुर्ला तालुक्यात मुलानेच आईवर गोळी झाडून हत्या
घरगुती वादातून घडलेली धक्कादायक घटना
आरोपी उमेश सरमळकर पोलिसांच्या ताब्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ
Vengurla Son Killed Mother वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर वय ६५ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार १४ जानेवारीला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अणसुर पाल मडकीलवाडी वेंगुर्ला येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत व आरोपी यांच्यात वारंवार घरगुती वाद व भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदुकीने थेट आईवर गोळी झाडली.
ही गोळी वासंती सरमळकर यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाईक जागृती सरमळकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याला ताब्यात घेतले आहे.
आरोपी उमेश विरोधात कलम १०३ (३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात दुपारी हजर केले जाणार आहे. घटनेचा अधिक तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत. या घटनेमुळे वेंगुर्ला तालुक्यात खळबळ उडाली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.