
सातारा : श्रावण (shravan) सोमवार निमित्त आज सकाळपासूनच राज्यभरातील महादेवाच्या मंदिरात श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून असलेले काेराेनाचं (corona) संकट दूर झाल्याने सण उत्सव माेठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. श्रावण मास सुरु झाल्याने शंकराचे भक्त साेमवारी व्रत कैवल्य करुन महादेवाची भक्तीभावाने पूजा अर्चा करीत असतात. आज (shravan somvar) राज्यभरातील महादेवाच्या (shiva shankar) मंदिरात भाविकांची मांदियाळी पहावयास मिळत आहे. (shravan somvar latest marathi news)
सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारची महापूजा मोठ्या भक्तीमय धार्मिक वातावरणात संपन्न झाली. यावेळी काशी पिठाचे नूतन जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींची प्रमुख उपस्थिती होती. श्रावण सोमवार निमित्त सकाळपासूनच भाविकांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सिद्धेश्वर महाराजांच्या योग समाधीला फुलांची सुंदर आणि आकर्षक अशी आरास करण्यात आली होती.
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त संपूर्ण सिद्धेश्वर मंदिरात एक धार्मिक वातावरण बघायला मिळाले. पहाटेपासूनच अबाल वृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षात मंदिरात नित्योपचार झाले असले तरी भाविकांना मज्जाव होता. त्यामुळे सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी भावीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शिव विष्णू मंदिरात भाविकांची गर्दी
आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त नवी मुंबईतील वाशी येथील शिव विष्णू मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली हाेती. यासोबतच वज्रेश्वरी येथून पायी चालत कावड यात्रेकरू शिवलिंगावर जल चढविण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिव विष्णू मंदिरात आले. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भक्तांना दर्शन घेता आले नव्हते मात्र यंदा सर्व निर्बंध उठवल्याने मोठ्या उत्साहात भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत असून भक्तिमय वातावरणात पहिला श्रावणी सोमवार साजरा करण्यात येत आहे.
श्री क्षेत्र डोंगरगणावर उत्साह
अहमदनगरच्या श्री क्षेत्र डोंगरगण येथील रामेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी श्रावणी सोमवार निमित्त पाहायला मिळाली. यावेळी महादेवाला जलाभिषेक घालून पूजा करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हाभरातून भाविक डोंगरगणला येथे दर्शनासाठी येत आहेत. प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांनी या परिसरात वास्तव्य केलं असल्याने या मंदिराला रामेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या बाजूलाच प्रभू श्रीरामांनी बाण मारून सीता मातेसाठी एक स्नानगृह निर्माण केल्याची आख्यायिका आहे. तिथे देखील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात हिरव्या गार झाडी असल्यामुळे भाविकांना पर्यटनाचा देखील आनंद मिळत आहे.
औंढा नागनाथ येथे भाविकांची मध्यरात्रीपासून गर्दी
पहिल्या श्रावणी मासानिमित्त देशभरातील शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे, देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिरात देखील प्रभू शिव शंकराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने रांगा लावल्या होत्या, बम बम भोले, ओम नमः शिवाय च्या गजरात आलेल्या शिवभक्तांसाठी, मंदिर प्रशासनाने शासकीय महापूजा आटोपल्यानंतर रात्री दोन वाजता हे शिवमंदिर खुलं केलं होतं.
भिमाशंकरची बाजारपेठ भरली
लॉकडाऊन पासुन भिमाशंकर बंद ठेवण्यात आल्यानंतर भिमाशंकरची हार,बेलफुले,प्रसाद आणि खेळण्याची दुकाने बंद ठेवण्यात आली होती आता श्रावण मासाचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाल्याने भिमाशंकरची बाजारपेठ फुलुन गेली. लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकरला दाखल होत असुन शिवभक्तीला हार बेलफुल प्रसाद ठेवण्यासाठी भाविकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदाचा श्रावण मास भिमाशंकरच्या बाजारपेठेला आधार देणारा ठरतोय.
परळीत भाविकांची गर्दी
देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या, बीडच्या परळी येथील प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये, श्रावण सोमवार निमित्त भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. आज पहाटेपासूनच वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकानी रांगा केल्या होत्या. शिव हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परीसर दणाणून निघालाय.
कोरोना महामारी नंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यात भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले आहे. त्यामुळे दर्शनासाठी देशभरातून भाविक गर्दी करत आहेत. प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सर्वांना सुव्यवस्थित करता यावे, याकरिता मंदिर व्यवस्थापनाने जयत तयारी केली आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या पायरीवर बॅरिकेट्स लावल्या असून मंदिर रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने श्रावण सोमवारनिमित्त योग्य बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान श्रावण महिन्यात महिनाभर विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.