
राज्यातील सरकार आणि सत्ताधारी पक्ष माजले आहेत. विधिमंडळाच्या आवारात काल घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला आहे, अशी तीव्र टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना जबाबदार धरत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
संजय राऊतांनी विधान भवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या प्रकरणानंतर भाजपवर टीकेची तोफ डागली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 'सरकार माजलंय, सत्ताधारी माजलेत. विधिमंडळाच्या आवारात जे काही घडलं, यामुळे राज्याच्या संस्कृतीला डाग लागलाय. याला सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणं कारणीभूत आहेत. गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जातोय. वाशिंग मशीनमध्ये घालून साफ केलं जातंय. सरंक्षण दिलं जातंय. यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
'गुन्हेगारांची भरती थांबली की, माज आपोआप उतरेल. यासाठी कायद्याची गरज नाही. आमच्या पक्षात गुन्हेगारांना प्रवेश नाही. गुन्हेगार प्रवृत्तीच्या गुंडांना भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये टाकून, धुवून आमच्या पक्षात वाळत घालणार नाही. असा जीआर जर त्यांनी काढला तरच विधिमंडळाच्या आवारात अशा घटना घडणार नाही', असंही राऊत म्हणाले आहेत.
'दाऊद इब्राहिम मुंबईत आला तर, त्याच्यावर नवीन गुन्हे नाहीच, असं म्हणत त्यालाही पक्षात सामील करतील. नाशिकमध्ये पक्ष प्रवेश कराण्यासाठी जसे गुन्हेगारांचे गुन्हे मागे घेतले. तसे दाऊद इब्राहिम, मेनन यांचे देखील गुन्हे मागे घेऊन, त्यांना पक्षात जागा देण्यात येईल. कारण आमच्यासारखा विरोधकांचा कायदेशीर किंवा लोकशाहीने नाही, तर बळाचा अन् शस्त्राचा वापर करून यांना संपवायचं आहे, असा आरोप यावेळी राऊतांनी केला.
संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटलं, 'विधानभवनामध्ये एका आमदाराची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. मकोका आणि खुनाचे गुन्हे असलेले लोक विधानभवनात येतात, सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करतात आणि ते सगळे भाजपशी संबंधित आहेत. एवढी हिंमत येते कुठून? कारण त्यांच्यावरही तसेच गुन्हे दाखल आहेत.'
भाजपवर टिकास्त्र डागत राऊत म्हणाले, 'गुन्हेगारांची भरती केल्यामुळे, भाजप गुन्हेगारांचे अश्रयस्थान झालंय. गुन्हा करायचा, पक्षात जायचं, तिकीट मिळवून आमदार, खासदार किंवा मंत्री व्हायचं आणि संरक्षण घ्यायचं, सध्या ही राज्याची स्थिती आहे. त्यामुळे हे सत्ताधारी कोणत्या महाराष्ट्र संस्कृतीच्या गप्पा मारतायेत?' अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.