अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे घासलेट चोर आहेत, ते घासलेट चोरुन विकायचे असा गंभीर आरोप अकोला राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड (Shiva Mohod) यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (NCP) वाद चव्हाट्यावर आला आहे.
आमदार अमोल मिटकरी निधी देण्यासाठी कमिशन मागतात असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहड यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या समोर मूर्तिजापूर येथील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीत केला होता. शिवाय मिटकरी हे काम करताना कमिशन मागतात एकाच गावाला खूप निधी देतात असे अनेक आरोप मोहोड यांनी केले होते.
पाहा व्हिडीओ -
मोहोड यांच्या आरोपांना अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं, माझ्यावर आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं त्यांच्यावरील आरोप आणि गुन्हे तपासावे, तसंच शिवा मोहोड यांचा विकासनिधीसाठीचा एकही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. तसंच त्यांनी मला दिलेला एखादा प्रस्ताव दाखवावा असं आव्हान मिटकरी यांनी दिलं होतं.
मिटकरींनी दिलेल्या आव्हानानंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष मोहोड यांनी मिटकरींवर गंभीर आरोप करत जहरी टीका केली आहे. आमदार मिटकरी यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, ते सतत इतरांना मंगळसुत्र चोर, कोणाला जॉनी लीवर म्हणत असतात. मात्र, आमदार अमोल मिटकरी हे घासलेट चोर आहेत.
आमदारांकडे लायसन्स होतं ते घासलेट चोरुन विकायचे, आचारसंहिता होती म्हणून मी काही बोलत नव्हतो. मात्र आता त्यांनी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यामुळे आपण बोलत असल्याचं ते म्हणाले. शिवाय मिटकरी यांनी माझ्या चारित्र्याची तपासणी करावी त्यात काही खोट आढळल्यास आपण भर चौकात फाशी घेईन असंही मोहोड यावेळी म्हणाले.
पातूरचं प्रकरण काय महिला पदाधिकाऱ्याचं प्रकरण काय आहे? काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला १० लाख का दिले? पुण्याच्या महिला पदाधिकारी अकोल्यात का राहिल्या होत्या? असे अनेक प्रश्न मोहोड यांनी उपस्थित केले. जिल्हाध्यक्ष मोहोड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे राष्ट्रवादी पक्षातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं आहे.
जिल्हाध्यक्षांनी काय आरोप केले ?
आमदार अमोल मिटकरींनी अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ५० कोटीचा निधी आणला. त्यातून पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नाही. जिल्हाध्यक्षांना २० कोटीचा निधी देताना मिटकरी यांनी कमिशन मागितलं. तर मिटकरी यांनी एकट्या कुटासा गावात १६ कोटीचा निधी दिला असल्याचे आरोप मिटकरी यांच्यावर करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.