
मुंबई : केंद्रातील भाजप आणि राज्यातील फडणवीस सरकारने, तसेच भाजपच्यावतीने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात आला. कारण, देशात २५ जून १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी लागू केली होती. या आणीबाणीचा विरोध करत, निषेध नोंदवत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केलं. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणीच सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुंबईतील एका कार्यक्रमातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. 'हुकूमशाहींच मोठं उदाहरण म्हणजे श्वेता संजीव भट आहेत, गेल्या ७ वर्षापासून स्वतःच्या पतीसाठी त्या लढत आहेत', असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला. तसेच, 'आणीबाणीतील शंकरराव चव्हाणांचा मुलगा आज भाजपसोबत आहे', असा मिश्कील टोलाही राऊतांनी यावेळी लगावला.
'भाजपचे लोक सांगतायत की आणीबाणी हा काळा अध्याय आहे. पण, मला वाटतंय अनेक काळे अध्याय आहेत, मोठा काळा अध्याय म्हणजे महात्मा गांधी हत्या झाली. दुसरा काळा अध्याय कोणता तर प्रेसिडंट ट्रम्पच्या दबावाखाली देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला, यापेक्षा मोठा काळा अध्याय कोणता असेल? हे काय आम्हाला आणीबाणी सांगताय', असं म्हणत संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर आणि आणीबाणीवरुन काँग्रेस, शिवसेनेला डिवचणाऱ्यांवर पलटवार केला.
'पहलगाम हल्ला आणि पाकिस्तानविरुद्धच्या लढाईसंदर्भाने आम्ही मागणी करतोय की, विशेष अधिवेशन बोलवा पण ते बोलवत नाहीत आम्हाला विचारायचं आहे की मोदीजी आपण सरेंडर का झालात?' असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 'आणीबाणीवेळी अनेक पत्रकारांवर कारवाई झाली. काहींची वर्तमानपत्र बंद झाले, त्यात आमचं मार्मिक होतं. तेव्हा वर्तमानपत्र बंद पाडणारे शंकरराव चव्हाण यांचा मुलगा आता भाजपला जवळचा झाला आहे. अशोक चव्हाण आता मोदींना प्रिय झाले आहेत', असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.