

शिवसेना पक्षाचं नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावरील हक्काच्या वादावर आज गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु आहे. या प्रकरणावर बुधवारीही सुनावणी झाली होती. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केलाय. काल न्यायालयात झालेल्या युक्तिवादानंतर शिंदे गटात अस्वस्थता वाढली असून त्यांच्यासमोर आता भाजपमध्ये विलीन होण्याचा पर्यायच उरल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात अतिशय ठोस आणि प्रभावी युक्तिवाद केला. फक्त विधीमंडळातील काही आमदारांचा गट फुटला म्हणून मूळ राजकीय पक्ष फुटला असं मानता येणार नाही, ही भूमिका त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर स्पष्टपणे मांडली. मी देखील न्यायालयात उपस्थित होतो. सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या मनात काही प्रश्न आणि शंका होत्या. त्या सर्व मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलं.
राऊत म्हणाले, एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक कायदेशीर नियम न पाळता सत्तेत सहभागी होत असतील तर त्याचा लोकशाही आणि संविधानावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी न्यायालयाने बंधनं घातली पाहिजेत."
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं, "फूट ही विधीमंडळ पक्षात पडली होती. ती सत्तेचं आमिष आणि वैयक्तिक फायद्याच्या अपेक्षेतून पडली. मात्र त्यामुळे मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेकडेल राहील. शिवसेनेकडेच पक्ष आणि धनुष्यबाण राहायला हवा, हीच आमची भूमिका न्यायालयात मांडण्यात आली. आमच्या वकिलांनी न्यायालयाचे समाधान होईल अशा पद्धतीने सर्व मुद्दे मांडले. सुनावणीदरम्यान न्यायालय संविधानाच्या तत्त्वांबाबत अत्यंत जागरूक असल्याचं जाणवलं. हा देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा खटला आहे आणि या निकालाचा भविष्यात संपूर्ण देशावर दूरगामी परिणाम होऊ शकतो, याची जाणीव सरन्यायाधीशांनाही आहे. त्यामुळे आता आम्ही निश्चिंत आहोत. पुढे कायदा आपले काम करेल. आमच्याशी बेईमानी केली तसंच संविधानाशीही द्रोह करण्यात आला. त्यामुळे आम्ही कायद्याच्या मार्गाने याला उत्तर देऊ."
संजय राऊत यांनी आणखी एक मोठा दावा करताना सांगितलं, माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार समोरच्या गटात सध्या मोठी अस्वस्थता आहे. आता संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वीही एक छोटा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आला होता. सध्या त्याच प्रकारच्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे. लवकरच शिंदे गटातील काही नेते दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. निवडणूक आयोगाचा चुकीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यास लावल्यास महाराष्ट्रातील जनता आणि देशातील लोकशाहीचा मोठा विजय होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.