
Sangli News : मार्च एन्ड जवळ येत असल्यानं राज्यातल्या सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांनी करवसुलीवर जोर दिलाय. मात्र सांगली महापालिकेनं करवसुलीसाठी थेट देवालाच नोटीस पाठवलीय. शहरातील एका म्हसोबा मंदिरला महापालिकेकडून घरपट्टीची नोटीस पाठवण्यात आली आहे.. म्हसोबा मंदिरच्या नावे 1 हजार 62 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आलीय. वाढीव घरपट्टीसाठी सांगली महापालिकेमार्फत नुकताच एक सर्वे करण्यात आला. त्यानुसार शहरातल्या मालमत्तांना वाढीव घरपट्टीची नोटीस बजावली जातीय.
महापालिकेनं सांगली शहरातल्या खणभाग इथल्या म्हसोबा गल्लीतल्या म्हसोबा मंदिरालाही नोटीस बजावलीय. विशेष म्हणजे हे म्हसोबा मंदिर कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे महापालिकेनं म्हसोबा मंदिराच्या नावानं दिलेलं घरपट्टी बिल कोण भरणार? आणि महापालिका या म्हसोबा मंदिराच्या घरपट्टीच्या वसुलीबाबत काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित झालाय..नागरिकांनी पालिकेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. तसच वाढीव घरपट्टीविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिलाय.
महापालिकेनं वाढीव घरपट्टीसाठी ड्रोनद्वारे सर्व्हे केल्याचा आरोप होतोय. ज्या मालमत्ता नोंदणीकृत नाहीत अशा 29 हजार मालमत्तांना नोटीस बजावण्यात आलीय. तर वाढीव घरपट्टी अमान्य असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी, समिती त्यावर निर्णय घेईल असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
घरपट्टीचं निर्णय राज्य सरकारचा असल्याचं सांगून चंद्रकांत पाटलांनी महापालिकेच्या मानेवरचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न केलाय खरा. मात्र देवाला आलेल्या नोटिशीचं काय? म्हसोबा मंदिराच्या नावानं पाठवलेली घरपट्टी कोण भरणार? की नियमानुसार घरपट्टी भरली नाही म्हणून पालिका देवाची मालमत्ता जप्त करणार? हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.