Sambhaji Bhide News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भिडे यांनी साम टिव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी टिकली लावली नाही म्हणून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
'तू टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलेन', असे अजब विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभरातील महिलांनी निषेध केला आहे. टिकली लावावी की नाही याबाबत भिडे यांना बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत, विविध क्षेत्रातील महिलांनी भिडे यांचा जाहीर निषेध केला.
यादरम्यान सोशल मीडियावर #टिकलीचाआग्रहनकोच असा हॅशटॅश ट्रेंड होतो आहे. महिला पत्रकार, तसेच विविध क्षेत्रातील महिला भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करून टिकली लावावी की नको याबाबत आपलं मत मांडत आहे.
पत्रकाराला टिकली लावूनच बोलण्याच्या अजब आग्रहावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे गुरुजींना काही प्रश्न विचारले असता त्यांनी महिलांच्या वैयक्तिक बाबतीत झोटिंगशाहीची भुमिका घेतली, असं ट्विट नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी सुद्धा भिडे यांना खडे बोल सुनावले आहे. महाराष्ट्रात स्वत:ला गुरूजी म्हणून घेणाऱ्या संभाजी भिडे यांना महिलांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? बिल्कीस बानो अत्याचार झाले तेव्हा आरोपींना तुमच्या लोकांनी सोडलं, तत्काळ महिलांची माफी मागा, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडेंच्या या विधानानंतर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. 'महिला पत्रकाराला तु टिकली लावली नाही म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असे सांगत त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे'.
'याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी आज केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा', असं महिला आयोगानं म्हटलं आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.