Ravindra Chavan Interview: प्रदेशाध्यक्षपद हे प्रमोशन की डिमोशन,राज्यात विरोधक असणार? थेट सवालांवर रविंद्र चव्हाणांचं परखड उत्तर

Ravindra Chavan Interview: शिर्डीत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात रविंद्र चव्हाण यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर आज त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिलीय.
Ravindra Chavan Interview
Ravindra Chavan InterviewSaam Tv
Published On

महायुतीचं सरकार आल्यानंतर सुरू झालेल्या मंत्रिपदाच्या रस्सीखेचात अनेक नेते नाराज झाले होते.भाजपचे काही नेतेही मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज झाले होते. त्यातील एक नेते म्हणजे रविंद्र चव्हाण. चव्हाण यांची नाराजी दूर करत भाजपने त्यांच्यावर थेट पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीय. कार्यकारी अध्यक्षदी विराजमान झाल्यानंतर त्यांन साम टीव्ही वृत्तवाहिनीच्या ब्लॅक अँड व्हाईट या खास कार्यक्रमात मुलाखत दिलीय.

यावेळी त्यांनी मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विरोधी पक्षांबाबत अजेंडा काय असेल, राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत दिलखुलास उत्तरे दिली. तसेच येत्या काळात भाजप निवडणुकांसाठी कशाप्रकारची रणनिती आखत आहे, पक्षाची पुढची भूमिका काय असणार यावरही त्यांनी भाष्य केलंय.

प्रश्न - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार?

उत्तर -

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यावरून त्यांना महायुती म्हणून भाजप महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार का असा प्रश्न करण्यात आला. या निवडणुकांच्या वेळी त्या त्या ठिकाणच्या महानगरपालिकेवरून ज्येष्ठ मंडळी त्याबाबत निर्णय घेतील. महायुती किंवा स्वबळावर लढण्याच्या चर्चा ह्या लोकसभेवेळी देखील होत्या. विधानसभा निवडणुकीच्यावेळी या चर्चा होत्या.

परंतु देवेंद्र फडणवीस असो अजित पवार किंवा एकनाथ शिंदे असो हे तिन्ही नेते राज्यात एक आदर्श निर्माण करणारं काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं आणि जनतेचं कुठेही नुकसान होणार नाही. त्यांनी तिघांनी त्या-त्यावेळी जागावाटपासाठी सहमती झाली आणि महायुतीला मोठं यश आले. या तिन्ही नेत्यांची बॉन्डिग चांगलंय. जनतेचं हित कशामध्ये आहे ते पाहून वरिष्ठ मंडळी आमच्यासारख्या नेत्यांना निर्णय देतील.

प्रश्न- संसद ते पंचायत तक भाजपच कसं शक्य होणार?

हे बघा प्रत्येक पक्ष हा आपल्या अधिवेशनात आलेल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात, त्यांना प्रोत्साहित करत असतात.आता तुम्ही ज्या नाऱ्याविषयी बोलत आहात तो नारा पार्लमेंट ते पंचायत असा असून अमित शहा यांनी हा नारा दिलाय. ते जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, त्यावेळपासून हा नारा दिला जात आहे. नारा ज्यावेळी दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की, आपल्याला जगभरातील जितके राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी आपला पक्ष सर्वात मोठा करायचा आहे.

अमित शहा जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे जगभरात सदस्य होते. परंतु त्यानंतरच्या काळात शहा यांच्या नेतृत्त्वाखाली आणि भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीने आज भारतीय जनता पक्ष जगभरात प्राथमिक सदस्य सर्वात जास्त असणारा एकमेव पक्ष आहे. यामागील कारण म्हणजे भाजप पक्ष एक व्हिजन घेऊन जात आहे. पक्षातील नेते त्या व्हिजनला पुढे घेऊन जात असून सर्व नेत्यांच्या डोळ्यासमोर आहे. यात आमचा एक अजून नारा आहे, सशक्त भाजप, याचा अर्थ आहे की, ज्यावेळी तुम्हाला सशक्त भारत करायचा आहे, तेव्हा सशक्त भाजप असणं आवश्यक आहे.

प्रश्न- प्रदेशाध्यक्ष पद मिळणं प्रमोशन की डिमोशन?

भाजपध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनात्मक पद चांगल्या पद्धतीचं मिळावं यासाठी त्याची धडपड असते. त्यामुळे पक्षाचं काम करायला सुरुवात केली तेव्हापासून नेहमीच विचार असा विचार केला की, संघाटत्मक कामात फार रुची असल्याने यात वेगळा आनंद असतो. केंद्रीय नेत्याशी भेटीगाठी होत असतात आणि केंद्रीय नेत्यांचे केले जाणारे कार्यक्रम. त्या कार्यक्रमातील नावीन्य तसेच पक्षवाढीसाठी केलं जाणाऱ्या कामात आनंद मिळत असतो. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रिपदापेक्षा या अशा संघटनात्मक पद महत्त्वाचं वाटतं.

प्रश्न- विरोधक संपून जावा असं भाजपला वाटतं, मग विरोधी पक्षाबाबत रविंद्र चव्हाण यांचा काय अजेंडा असेल?

देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. परंतु विरोधी पक्षांची भूमिका जी पाहिजे ती भूमिकाच त्यांना नाहीये. आधी जेव्हा अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असायचे तेव्हा ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून आपली भूमिका मांडायचे. पण आज तसे राहिले नाहीये. आज विरोधक कमी कमी होत आहेत त्या मागील कारण काय तर, आताचे जे विरोधक आहेत त्यांची धोरण राष्ट्रहिताच्या विरोधात आहेत.

देशाच्या शत्रूंचा गौरव करणारे विधाने विरोधी पक्षांकडून केली जातात. त्यामुळे आपल्या देशातील नागरीक विरोधीपक्षाविषयी काय विचार करतील. त्यामुळे त्यांच्याविषयीचं मत वेगळं होऊ लागलं. समाजातील वर्ग देशाचं अहित असलेल्या पक्षासोबत का जावं असा विचार सामान्य लोक करतात.

प्रश्न- राज्यातील कायदा सुव्यस्थेवर प्रश्न उपस्थित होता आहेत, अशात एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार?

कायदा सुव्यवस्था नीट करणं हे सरकारच काम आहे. सरकर त्यावर काम करत आहे. पण त्याला वेळ लागेल. याचबरोबर त्याला लागणार सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वात ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा निश्चित होणार. तसेच माध्यमांनी सकारात्मक गोष्टी दाखवल्या पाहिजेत. राज्यात आलेल्या प्रोजेक्टविषयी माहिती दिली पाहिजे. यातून मोठा रोजगार निर्माण होणार आहे.

माध्यामांनी नेतृत्त्वाला प्रकल्पांविषयी प्रश्न केली पाहिजेत की प्रकल्प कधी पूर्ण होतील. जसे की, वाढवण बंदर आहे, जेव्हा नेतृत्व काहीतरी कालावधी देईल. तेव्हापासून त्याचा काउंटडाऊन सुरू केलं पाहिजे.सांगितलेल्या कालवधीतील इतके दिवस पूर्ण झाले तर प्रकल्पाचे काम किती झाले, कसे झाले याची माहिती घेतली पाहिजे त्याचे प्रश्न केली पाहिजेत. बारसू किंवा वाढवण बंदर या प्रोजेक्टमधून हजारो रोजगार निर्माण होणार आहे. पण काय होतं आपण एखादी वाईट घटना घडली का त्याची चर्चा जास्त करतो. पण चर्चा केली पाहिजे, त्यावरील उपाय योजनेच्या चर्चा केल्या पाहिजे. मात्र एक गोष्ट वाईट घडली म्हणून चांगल्या झालेल्या ९९ गोष्टींकडे पाहिले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com