मुंबई–गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ लक्झरी बसला मध्यरात्री भीषण आग लागली.
बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले; जीवितहानी टळली.
टायर फुटल्याने बस पेटली व काही क्षणांतच जळून खाक झाली.
महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला, पण नंतर सुरळीत करण्यात आली.
अमोल कलये, रत्नागिरी
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणवासीय कोकणाकडे रवाना होत आहेत. अशातच शनिवारी रात्री मुंबईहून कोकणच्या दिशेने निघालेल्या एका लक्झरी बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षितरित्या बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र आग एवढी भयानक होती की काही क्षणांतच संपूर्ण बस जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी हजारो भाविक दरवर्षी कोकणात परततात. यंदाही मुंबई व उपनगरातून गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही बस भाविकांना घेऊन कोकणात निघाली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास बस कशेडी बोगद्याच्या सुरुवातीला पोहोचताच अचानक टायरचा मोठा आवाज झाला. टायर फुटल्याच्या क्षणातच बसच्या पुढच्या भागातून ठिणग्या उडाल्या व काही क्षणांतच आगीच्या ज्वाळा उसळल्या. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.
बस पूर्णपणे पेट घेण्यापूर्वीच चालक व वाहक यांनी तत्परतेने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. प्रवासी बाहेर पडल्यानंतर काही क्षणांतच आग संपूर्ण बसभर पसरली. पाहता पाहता बस आगीत भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिस, तसेच खेड आणि महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती.
या घटनेमुळे मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी आहे. त्यात या घटनेमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांनी काही तासांत वाहतूक सुरळीत केली असली तरी प्रवाशांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
बस आगीत पूर्ण जळून खाक झाल्यामुळे मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र एकाही प्रवाशाला इजा झाली नसल्याने ही मोठी दिलासादायक बाब ठरली. कोकणात जाण्यासाठी लोकांचा मोठा ओढा असल्याने सध्या मुंबई–गोवा महामार्गावर असंख्य बस, खासगी वाहनं व एसटी गाड्या सतत धावत आहेत. अशा परिस्थितीत घडलेली ही दुर्घटना महामार्गाच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न निर्माण करते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.