तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. खरीप हंगामातील पीके काढणीला आल्याने शेतकऱ्याने शेतीकामांना वेग दिला आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बुधवारी पहाटेपासूनच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी खरीप हंगामातील पीके झाकून ठेवण्यासाठी शेताकडे धाव घेतली.
मंगळवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. आज म्हणजेच बुधवारी पहाटेच्या सुमारास कोल्हापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ऐन खरीप हंगामातील पीके काढणीला आली असताना अवकाळीचं संकट येऊन ठेपल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पीकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे. अरबी समुद्रात सोमवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्यामुळे वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
सध्या केरळ व तमिळनाडू राज्यातील पाऊस आणखी वाढला आहे. ही स्थिती पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जात आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी कोकण व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, उर्वरित राज्यात काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने थंडी कमी जाणवणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.