Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही १०० हून अधिकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत ७५ जणांचा वाचवण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणाने थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास इर्शाळवाडी गावात पाऊस जास्त सुरू असल्याने हा तरुण आपल्या मित्रांसोबत शाळेत झोपायला गेला होता. त्याचे आई-वडिल घरातच झोपून होते. "आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो. माझ्या आई-बाबांना पळताही आलं नाही. घर राहिलं नाही आता फक्त माती उरली आहे", असं सांगत असताना मुलाला हुंदका अनावर झाला होता.
बुधवारच्या काळोख्या रात्रीत गावावर ओढावलेला थरारक प्रसंग सांगताना या तरुणाच्या हातापायाचा थरकाप उडत होता. आम्ही ५ ते ६ मित्र दररोज रात्री गावातील शाळेत झोपायला जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री सुद्धा आणि शाळेत आलो. रात्रीच्या वेळी दोन वेळा मोठ्ठा आवाज झाला आणि आम्ही बाहेर पळालो.
बाहेर बघितलं तर काय संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं. आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो. आई-बाबांना पळताही आलं नाही. घर नाही राहिलं, फक्त मातीच आहे, असं सांगतानाही त्याला हुंदका अनावर होत होता. तरुणाने सांगिलेला हा प्रसंग ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरंगत होते.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात येणार आहेत. तसेच दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं. तसेच जखमींची विचारपूस करून अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा आढावा घेतला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.