Nitin Gadkari Pune Nagpur expressway plan Update : पुण्याहून नागपूरला रस्ते मार्गाने जाण्यासाठी फक्त ५ तास लागतील, असा विचारही खूप कमी लोकांनी केला असेल. जवळपास ७०० किमीच्या प्रवासासाठी १० तासांचा वेळ लागतो. पण नव्या महामार्गामुळे हे अंतर कमी होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-नागपूर नव्या महामार्गाची घोषणा केली आहे. या मार्गामुळे पुणे ते नागपूर हा प्रवास फक्त ५ तासात पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. गडकरींनी नेमकं काय सांगितले? याचा फायदा कुणाला जास्त होणार? याबाबत जाणून घेऊयात..
पुण्याहून नागपूरला ५ तासात पोहचणं शक्य होणार आहे. नितीन गडकरी यांनी मास्टरप्लान सांगितला. पुणे-संभाजीनगर हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. याचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोण्यात येणार आहे. पुण्याहून संभाजीनगर फक्त दोन तासात पोहचता येणार आहे. तर सध्या संभाजीनगर-नागपूर समृद्धी महामार्गावरून फक्त ३ ते साडेतीन तास लागतात. त्यामुळे भविष्यात पुणे-नागपूर हे अंतर पाच ते सहा तासात सहज शक्य होऊ शकते. सध्या या प्रवासासाठी दहा ते १२ तासांचा कालावधी लागतो.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच एक्सप्रेसवे पुणे अन् संभाजीनगर या मार्गावर तयार होणार आहे. पुणे-छत्रपती संभाजीनगर असा १६ हजार ३१८ कोटींचा एक्स्प्रेस वे बांधण्यात येणार आहे. यामधील पहिल टप्पा टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा राहणार आहे. या मार्गाची दुरुस्ती आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी २ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगरहून नागपूर अडीच ते पावणे तीन तासात शक्य होणार आहे. लवकरच या महामार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याशिवाय शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून दुसरा रस्ता काढण्यात येईल. यातील केवळ टोलचे काम शिल्लक आहे. त्यामुळे पुण्याहून बीडला जाणेही सोप्पं होणार आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्पांतर्गत खाली रस्ता, त्याच्यावरती दोन उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा चार स्तरावरील ४ हजार २०७ कोटींचा प्रकल्प असणार आहे.हडपसर ते यवत हा एलिव्हेटेड स्वरूपाचा ५ हजार २६२ कोटींचा प्रकल्प असेल. नाशिक फाटा ते खेड या मार्गासाठी ९३ टक्के भूसंपादन झाले आहे. नाशिक फाटा ते आळंदी पहिल्या टप्प्यात तयार होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात आळंदी फाटा ते खेड प्रकल्प होईल. जवळपास ५० हजार कोटींची कामे एकट्या पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती गडकरींनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.