

Operation Tiger postponed news : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ६ खासदारांच्या कथित पक्षांतराची चर्चा सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात होणारा त्यांचा प्रवेश तूर्तास दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामागे 'तांत्रिक' आणि 'भावनिक' अशी दोन्ही महत्त्वाची कारणे आहेत. कोणतीही घाई न करता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचेही समजतेय.
कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती
ठाकरे पक्षाकडून ऐनवेळी व्हिप बजावला गेल्यास कोणतीही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी शिंदे गट खबरदारी घेत आहे. ठाकरे गट यावर काय कायदेशीर पावले उचलतो, यावर शिंदेंच्या नेतृत्वाचे बारीक लक्ष आहे. कोणत्याही कायदेशीर वादात अडकणे टाळण्यासाठीच हा प्रवेश काही काळ रोखण्यात आल्याचे समजते.
खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे 'भावनिक' कारण
या संभाव्य बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचाही समावेश आहे. १९ जून हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक आहे. कारण, त्यांच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) हत्या प्रकरणाचा तब्बल २० वर्षांनंतरचा अंतिम निकाल १९ जून रोजी कोर्टात लागणार आहे. अशा महत्त्वाच्या दिवशी कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षप्रवेश न करण्याचा आग्रह त्यांनी यांनी धरला होता. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना हा दिवस टाळण्याची विनंती केली. शिंदेंनीही त्यांच्या भावनेचा आदर करत हा सोहळा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत मध्यरात्री घडामोडी, वर्धापनदिनाचा मुहूर्त टळणार?
या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री दिल्लीत ठाण मांडले होते. संजय दीना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश आष्टीकर आणि ओम राजेनिंबाळकर या ६ खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे गेले आहे. या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याची चर्चा आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दुसरीकडे, खासदार फुटण्याच्या वृत्तामुळे सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापनदिन असल्याने, या दिवशी वाद टाळण्यासाठी हा मुहूर्त टाळण्यात आला आहे. आता हा पक्षप्रवेश २० किंवा २१ जून रोजी होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.