Nashik News: नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न (Nashik Onion Issue) पेटलाय. लिलावात कांद्याला भाव न मिळाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव (Onion auction) बंद पाडले. तर मुंबई- आग्रा (Mumbai -Agra Highway) आणि मालेगाव-नगर महामार्ग (Malegaon-Nagar Highway) शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने आज दिवसभरात जिल्ह्यात कांद्यावरून मोठा राडा झाला. नाफेडने जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळाल्याने तसंच कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानं नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न कायम आहे.
तब्बल ३ दिवसांच्या कोंडीनंतर कांद्याचा प्रश्न सुटला असं वाटत असतानाच आज नाशिक जिल्ह्यात कांद्यावरून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडाला. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, चांदवड, येवला, देवळा, उमराणे, कळवणमध्ये नाफेडने जाहीर केलेल्या भावापेक्षा कमी भाव मिळाल्याने तसंच नाफेडचे अधिकारी लिलावावेळी हजर नसल्यानं शेतकऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी ३ दिवसांनंतर सुरू झालेले कांदा लिलाव पुन्हा बंद पाडले. चांदवडमध्ये तर संतप्त शेतकऱ्यांनी २ तासांहून अधिक काळ मुंबई-आग्रा महामार्गावर चक्का जाम केला. तर येवल्यातही मालेगाव नगर महामार्ग रोखून धरण्यात आला. चांदवडमध्ये तर पोलिसांनी बळाचा वापर करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
बुधवारीच नाशिक जिल्हाधिकारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यात आल्याचे जाहीर केलं होतं. मात्र कांद्याचा जो मुख्य प्रश्न होता तो म्हणजे कांद्यावरील ४० टक्के निर्यात मूल्य रद्द करण्याचा आणि कांद्याला ४ हजार रुपये भाव देण्याचा त्या प्रश्नाला बगल देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष कायम होता. त्यात आज लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला २४०० रुपयांपेक्षा कमी बोली लागल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. कांद्याला नाफेडने जाहीर केलेल्या भावापेक्षा जास्त भाव मिळत नाही आणि कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द होत नाही तोपर्यंत कांद्याचा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय.
नेहमीप्रमाणे तात्पुरता तोडगा काढून कांद्याचा प्रश्न सुटला, अशी सरकार आणि राज्यकर्त्यांना वाटत असतानाच जिल्ह्यात आज कांदा प्रश्नावरून आंदोलनांचा वणवा पेटला. ३ दिवस वाट पाहूनही सरकार निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय घेत नाही, दुसरीकडे कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या संतापात आणखी भर पडलीय. पुढील काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनांना आणखी धार येण्याची शक्यता असून यावेळी शेतकऱ्यांना सरकारकडून वरवरची मलमपट्टी नाही तर ठोस उत्तर हवंय. त्यामुळे येत्या काळात सरकारला शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.