चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवून इस्रोने नवा इतिहास नोंदवलाय. यशस्वी चंद्र मोहिमेनंतर इस्रोने आता पुढील मोहिमेची तयारी सुरू केली असून इस्त्रोचं पुढील मिशन आता मिशन आदित्य आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो आता पुढील महिन्यात आदित्य एल १ ला अंतराळात पाठवणार आहे. (Latest Marathi News)
साऱ्या जगाचं इस्त्रोच्या ज्या मोहिमेकडे लक्ष लागलेलं होतं, ती मोहीम चंद्रावर यशस्वीपणे लँडर उतरवून इस्रोने कालच नवा इतिहास रचलाय. चंद्राला काबीज केल्यानंतर आता इस्रो एक नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. ते म्हणजे मिशन आदित्य. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचे आदित्य एल १ हे यान सप्टेंबर महिन्यात सूर्याकडे झेपावणार आहे.
या मिशनची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून आदित्य एलची असेम्ब्ली आणि इंटिग्रेशन बंगलोरच्या यू.आर. राव सॅटॅलाइट सेंटरमध्ये करण्यात आलीय. सप्टेंबर महिन्यात PSLV रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल १ सूर्याकडे झेपावेल. आदित्य एल १ हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावरील हॉलो ऑर्बिट लॉग रेंज पॉईंट १ या ठिकाणी स्थिरावेल.
आदित्य एल १ नेमकं कसं आहे?
- आदित्य एल १ चं वजन १४४५ किलो आहे.
- त्यात ७ पे लोड असणार आहेत.
- हे ७ पे लोड सूर्याभोवतीच वातावरण, लहरी, पार्टिकल्स, मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर्स याची माहिती देतील.
- ७ पैकी ४ पे लोड प्रत्यक्ष सूर्याकडे पाहत राहतील.
- उरलेले ३ पे लोड हे सूक्ष्म कण आणि त्या पॉईंट्सवरील वातावरणाचा अभ्यास करतील.
आदित्य एल १ ला अंतराळात ज्या ठिकाणी पाठवलं जाणार आहे. तो पॉईंट किंवा जागा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या पॉईंटवरून आदित्य एल १ सतत सूर्याचं दर्शन होत राहील. सूर्य आणि एल १ मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. त्यामुळे आदित्य एल १ ला विना अडचण सूर्याचं निरीक्षण करता येईल. सूर्याच्या हालचाली, उष्णता, मास इजेक्शन, सूर्याच्या ज्वाळा, अंतराळातील हवामान अशा अनेक शास्त्रीय दृष्ट्या महत्वाच्या माहितीचा अभ्यास करता येणार आहे. सुर्याबाबत नवीन माहिती आणि नवनवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे इस्त्रोच्या या मोहिमेकडे देखील सर्व जगाचं लक्ष लागलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.