राजेश भोस्तेकर -
रायगड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या अलिबाग तालुक्यातील थेरोडा, आग्राव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आज शिवसेनेने रेवदंडा रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांना शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी धारेवर धरून रस्ता कधी सुरू होणार असा जाब विचारला. शिवसेनेच्या आक्रमतेपुढे झुकून आग्राव 21 फेब्रुवारी तर थेरोडा रस्त्याचे काम 25 फेब्रुवारी रोजी सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनामुळे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रेवदंडा थेरोडा हा रस्ता 2018 साली मंजूर केला होता. यासाठी 1 कोटी 15 लाख निधी मंजूर असून माजी आमदार पंडित पाटील यांच्या सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला ठेका दिला आहे. काम अपूर्ण असूनही 25 लाख रुपये निधी ठेकेदाराने घेतला आहे. चौल आग्राव रस्तासाठी 1 कोटी 47 लाख मंजूर असून 77 लाख ठेकेदार कंपनीने घेतले आहेत. मात्र दोन्हीही रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे या खडतर रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. रस्ता पूर्ण करून देण्यास ठेकेदार असमर्थता दाखवत असल्याने शिवसेनेचे (Shivsena) सह संपर्क प्रमुख आणि राजीप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे (CM Village Roads Department) अधिकारी घटनास्थळी येत नाहीत आणि लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यत रस्ता रोको आंदोलन सोडणार नाही असा पावित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता. अखेर अधिकारी वर्ग हे पोलिसांसोबत आल्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही आंदोलन कर्त्यांनी दिला आहे. शिवसेनेच्या आंदोलनानंतर अधिकारी नरमले आणि काम लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.