Political Twist In Maharashtra: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी जशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार बहुसंख्य आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वापर करण्यात आला, असा दावा वारंवार करण्यात येत होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशाच प्रकारचा खळबळजनक दावा ठाकरे गटातील आमदार तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
"राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय १०० (पन्नास यंदा, पन्नास पुढील वर्षी) कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली! शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच...", असं खळबळजनक ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आहे.
अंबादास दानवे यांच्या ट्विटमुळे राज्यात पुन्हा एकदा खोक्यांवरून घमासान होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून खोक्यांचा वापर केला जातोय का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० शिवसेनेतून बंड केल्यानंतर '५० खोके एकदम ओके'च्या घोषणांनी महाराष्ट्र दणाणून गेला होता. राज्यातील प्रत्येक घराघरात ५० खोक्यांबद्दल चर्चा रंगली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी १०० खोके दिले, असा खळबळजनक दावा अंबादास दानवे यांनी केल्याने पुन्हा एकदा राज्यात खोक्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगात धाव घेत त्यांनी शिवसेना नाव पक्षचिन्हावर ताबा मिळवला. आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा अशाच प्रकारचा दावा केला असून आपल्यासोबत बहुसंख्य आमदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील हा वाद आता निवडणूक आयोगात जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेत ५३ आमदार आहेत. पक्षावर दावा सांगण्यासाठी यातील एक तृतीअंश आमदार अजित पवार यांच्याकडे असणे आवश्यक आहे. सध्या आपल्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.