
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, अनेक ठिकाणी पक्षप्रवेश आणि उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे बळ वाढले आहे. अपक्ष नेते देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी रविवारी शिवसेनेची मशाल हाती घेतली.
मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत २०० ते ३०० कार्यकर्त्यांनीही हाती शिवबंधन बांधलं. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
देवाभाऊ हरिभाऊ वाघमारे यांनी २०२४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पारड्यात मतांचा पाऊस पडला नाही. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मैदान मारायचं ठरवलं.
१३ जुलै रोजी मातोश्री येथे वाघमारे यांनी २०० ते ३०० कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, दत्ता गायकवाड, तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले. 'एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सगळं काही आहे. सत्ता, पद आणि अधिकार.. तरीही फोडाफोडीचं राजकारण सुरूये. हा आपल्याकडचा देवाभाऊ, आपल्याकडे काही नाही लढावं लागेल, असं सांगितलं आणि त्यांनी शिवसेनेची साथ दिली', अशा शब्दांत नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.