नाशिकच्या दिंडोरीमध्ये धक्कादायक घटना
विवाहित व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले
अत्याचारांमुळे पीडित मुलगी गरोदर
आरोपीने पीडितेला नवजात बाळासह निर्जन झोपडीत डांबून ठेवले
Nashik Dindori Rape Case News नाशिकमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दिंडोरी तालुक्यात एका विवाहित व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यानंतर ही मुलगी गरोदर राहिली. एवढ्यावरच न थांबता, प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने तिला पळवून नेले आणि प्रसूतीनंतर नवजात बाळासह एका निर्जन झोपडीत डांबून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पीडित मुलगी आणि तिच्या बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. रवींद्र मोरे असं या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र मोरे हा पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारांमुळे मुलगी गरोदर राहिली. मात्र, हा प्रकार उघडकीस येऊ नये आणि स्वतःवर कारवाई होऊ नये यासाठी आरोपीने पीडितेला पळवून नेल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीने मुलीला कानडी परिसरात नेले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर पीडितेची आणि नवजात बाळाची काळजी घेण्याऐवजी आरोपीने त्यांना सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील एका निर्जन झोपडीत ठेवले. बाहेरील जगापासून दूर ठेवून त्यांना तिथेच डांबून ठेवल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला अटक केली. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या नवजात बाळाची सुरक्षित सुटका करण्यात आली.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर दिंडोरीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित कायद्यांनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.