Nandurbar: ४२ दिवस उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही; मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एका बापाचा व्यवस्थेविरोधात लढा
नंदुरबार: मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल ४२ दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर बलात्कार (Sexual Assault) होऊनही तिचा खुन झाला असतांना पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला असा गंभीर आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. इतकंच नव्हे तर शवविच्छेदन अहवालातदेखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही, त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे. (Nandurbar Crime News)
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विवाहितने गळफास लावत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते, मात्र ही आत्महत्या नसून खून आहे, तसेच पीडितेवर बलात्कार झाल्याचा आरोपही तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह हा मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे.
पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एका जणाने बळजबरीने पीडितेला गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेऊन गेले होते. यानंतर पीडितेचा तिच्या नातलगाला फोन आला. या फोनवरील संभाषणात तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली. पीडितेने फोनवर सांगितले की, रणजीतसह चार जणांनी तिच्यावर चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत केले, तसेच ते (आरोपी) मला मारुन टाकतील असे पीडितेने फोनवर सांगितले.
या फोननंतर काही काळातच तिने (पीडितेने) वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतवण्यात आला होता. यावेळी पुरावे नष्ट केले गेले असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगुनदेखील मृत पावलेल्या पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडितेला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुंबियांनी केला आहे.
शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणातील संशयीत रणजीत ठाकरे याच्यासह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतांना पोलिसांच्या या भूमिकेचा पीडितेच्या वडिलांनी विरोध केला आहे. तिच्या वडिलांनी मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर मृतदेहाला अग्निडाग दिला परंतू त्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले आहे. या सगळ्या कठीणप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील वळवी कुटुंबियांसमवेत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत.
या ४२ दिवसात पीडितेच्या वडीलांसह ग्रामस्थांनी धडगाव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाने मांडले आहे. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षे यांच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंत्यसंस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. मुळातच मुलींच्या कुटुंबीयांची जर मागणी होतीच तर प्रशासनाने त्यापद्धतीने तहसिलदार अथवा न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीने तिचे पुर्न-शवविच्छेदन करणे क्रमप्राप्त होते. मात्र या सगळ्या प्रकरणात नेमकं पाणी कुठे मुरत आहे? असाच प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी याबाबत बोलतांना तपासाच्या अनुषंगाने जे तथ्य समोर आले, त्यानुसार अतिरिक्त कलमांचा या गुन्ह्यात समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अधिक्षकांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर या प्रकरणात पुर्नशवविच्छेदन करण्याच्या सूचना देखील त्यांनी धडगाव पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. यानुसार पोलिसांनी तालुका दंडाधिकारी यांना पत्र लिहुन पुर्नशवविच्छेदनाची मागणी देखील केली आहे.
पीडितेची मृत्यूआधी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबतच पोलिसांनी आधीच ठोस पावले उचलणे गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधूनदेखील काही तांत्रिक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळेच शवविच्छेदन अहवालानंतर काहीही निघो मात्र पीडितेच्या घरच्यांची अतिशय साध्या आणि सरळ मागणीची दखल प्रशासन कधी घेणार हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.