Nana Patole : फसवा अर्थसंकल्प! शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदतीचा भोपळा; नाना पटोलेंची सडकून टीका

Nana Patole News : देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे. या अर्थसंकल्पातून समाजातील कोणत्याच घटकाला काहीही ठोस असे मिळालेले नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
Nana Patole On Budget 2023
Nana Patole On Budget 2023saam tv

Nana Patole On Budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ असून केवळ मोठमोठ्या आकड्यांची घोषणा असे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

शेतमालाच्या हमीभावाबद्दल अर्थसंकल्पात काहीही नाही, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा नाही, तसेच जुन्या पेन्शनबद्दलही अर्थसंकल्पात कोणतेही सुतोवाच केलेले नाही. हा अर्थसंकल्प अर्थहीन आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले यां अर्थसंकल्पानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प फसवा आहे. या अर्थसंकल्पातून समाजातील कोणत्याच घटकाला काहीही ठोस असे मिळालेले नाही. अर्थसंकल्पाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांना वंदन करुन केली पण तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर कारवाई केली नाही.

Nana Patole On Budget 2023
Maharashtra Budget : शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख केला पण आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या तत्कालीन राज्यपाल कोश्यारींवर भाजपा मुग गिळून गप्प बसत असे. छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले पण ते स्मारक कधी पूर्ण होणार याबाबत बोलले नाहीत. मुंबई परिसराच्या विकासासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत, त्या केवळ आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या आहेत, असेही पटोले म्हणाले.

याशिवाय, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबद्दल जाहीर केलेल्या घोषणा या केवळ कागदावरच राहणाऱ्या घोषणा आहेत. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ किती मिळेल याबाबत शंकाच आहे. शेतमालाच्या हमी भावाबद्दल यात काहीच नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबद्ल एक शब्दही अर्थसंकल्पात नाही. पीकविमा हप्ता सरकारने भरला काय किंवा शेतकऱ्याने भरला काय, शेतकऱ्याच्या हातात नुकसान भरपाईपोटी काय मिळते हे दरवर्षी पाहतच आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

तसेच, हा जनतेचा पैसा वीमा कंपन्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. धान्याला जाहीर केलेली हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत कमी आहे. मविआ सरकारने धान्या प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता. तो बंद करुन या सरकारने हेक्टरी १५ हजार रुपये जाहीर केल्याने शेतकऱ्याचे क्विंटलमागे ३५० रुपयांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन देण्याची घोषणा केली पण शेतकऱ्यांचे वीज बील माफ करण्याबाबत घोषणा केलेली नाही. फडणवीस यांच्या घोषणांवर विश्वास ठेवता येणार नाही, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

Nana Patole On Budget 2023
Ajit Pawar On Budget: लबाडाघरचं आवताण, जेवल्याशिवाय खरं नाही; विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सरकारला खोचक टोला

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी ६.५ हजार कोटी रुपये कल्याण डोंबिवललीला देण्याची घोषणा केली होती पण त्यातील एक दमडीही दिली नाही. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास सरकारकडे पैसा नाही पण महिलांना ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. (Latest Polotocal News)

जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी जोर धरत असताना त्याबद्दल या अर्थसंकल्पात काहीच भाष्य करण्यात आलेले नाही. महामंडळांसाठी मोठे आकडे जाहीर केले आहेत पण मागील वर्षाचा खर्च पाहता ५० टक्केही खर्च झालेला नाही. मागास जातींबाबत आर्थिक तरतूद केली जाते पण ती खर्चच केली जात नाही हे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून दिसते, तब्बल ५० टक्के निधी खर्चच केलेला नाही.

महागाई प्रचंड वाढलेली आहे, जनतेला महागाईतून दिलासा देण्यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरवरचा व्हॅट सरकारने कमी करायला हवा होता पण त्यावरही काहीच भाष्य केलेले नाही. अंगणवाडी सेविकांना दिलेली मानधनवाढ सुद्धा अत्यंत तुटपुंजी आहे.

‘अमृतकाळ’ सारखे गोंडस नाव दिले पण प्रत्यक्षात शेतकरी, कष्टकरी, सामान्य जनतेला या अमृताचा अनुभव आलेला नाही व येणारही नाही. ६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे शिदे फडणवीस सरकारचे दिवास्वप्नच ठरणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा सुकाळ व अंमलबजावणीच्या नावाने दुष्काळ ठरणारा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com