नागपुरात 36 तासांचा शटडाऊन
6 ऑक्टोबर सकाळी 10 ते 7 ऑक्टोबर रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार पाणी पुरवठा
तांत्रिक कामामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम
नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा तब्बल 36 तासांसाठी प्रभावित होणार आहे. पाईपलाईन आणि फ्लो मीटर बदलण्याच्या कामासाठी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रात शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे जवळपास डझनभर पाण्याच्या टाक्यांशी संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (OCW) यांच्या माध्यमातून हे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शटडाऊनला सुरुवात होणार असून, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत हा शटडाऊन राहणार आहे. या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद किंवा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. या शटडाऊनदरम्यान मानकापूर नाल्याजवळ 1400 बाय 1400 मिलिमीटर व्यासाच्या मोठ्या पाईपलाईनच्या स्थलांतराचे काम करण्यात येणार आहे. त्यासोबतच ओंकारनगर परिसरात फ्लो मीटर बदलण्याचे महत्त्वाचे कामही केले जाणार आहे. भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे करण्यात येत आहेत.
या कामाचा थेट परिणाम शहरातील जवळपास डझनभर पाण्याच्या टाक्यांच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांना काही काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः शटडाऊनच्या काळात नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांनी शटडाऊन सुरू होण्यापूर्वी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन OCW आणि नागपूर महानगरपालिकेने केले आहे. दरम्यान, तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत केला जाणार आहे. मात्र, काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.