नागपूरच्या अशोक चौकात उड्डाणपूल घराच्या बाल्कनीतून जात असल्याचा प्रकार
NHAI कडून घर हटवण्याची मागणी, मनपाने नुकसानभरपाई नाकारली
घरमालकाला अडचण नाही, पण नागरिक अपघाताच्या धोक्याबाबत चिंतित
१ हजार कोटींच्या प्रकल्पातील नियोजन त्रुटीवर नागपूरकरांची टीका
नागपूर शहरात सुरू असलेल्या उड्डाणपूलांच्या बांधकामामुळे अशोक चौक परिसरात विचित्र प्रकार घडला आहे. इंदोरा ते दिघोरी दरम्यान सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून तयार होणाऱ्या उड्डाणपूलाचा एक भाग थेट घराच्या बाल्कनीतून जात असल्याचं दृश्य समोर आलं आहे. या घराचे मालक प्रविण पत्रे असून त्यांच्या घराच्या बाल्कनीतून उड्डाणपूलाच्या रोटरीचा एक भाग जातो आहे. त्यामुळे हा पूल सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नागपूर महानगरपालिकेला पत्र पाठवून संबंधित घर हटवण्याची मागणी केली आहे. मनपाकडून मात्र हे घर अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुढे घर काढले जाणार का, अथवा पूलाचा आराखडा बदलला जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, घरमालक प्रविण पत्रे यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना उड्डाणपूलाबाबत त्यांना काही हरकत नसल्याचं सांगितलं आहे. मात्र बाल्कनीतून पूल जात असल्याने भविष्यात अपघाताचा धोका कायम राहणार असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या या उड्डाणपूलाचे काम जोरात सुरू असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. पण उड्डाणपूलाचा काही भाग चक्क घराच्या बाल्कनीतून जाणे, हे नागपूरकरांसाठी आश्चर्यकारक दृश्य ठरत आहे. यापुढे वाहतूक सुरू झाल्यानंतर पत्रे यांच्या घरावर कसा परिणाम होणार, तसेच प्रशासन या परिस्थितीवर काय उपाययोजना करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.