
मुंबई : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं वक्तव्य करुन वादाला तोंड फोडणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चांगलच धारेवर धरलं. तुमचं हे वाक्य मराठी माणूस कधी विसरणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
भय्याजी जोशी यांनी काल बुधवारी मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटताना दिसले. भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाने जोरदार हल्ला चढवला. तर भाजपचे नितेश राणे, राम कदम यांनी प्रतिहल्ला करत भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. त्यानंतर आता राज ठाकरेही मैदानात उतरल्याने मराठी भाषेचा तापणार की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याचं ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं.... आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता... भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?
सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललयं हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव?
आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं !
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.