Maharashtra Monsoon 2023 Updates: उशीरा का होईना, पण यंदा राज्यात मान्सूनच्या जोरदार सरी बरसल्या. जून महिन्याच्या अखेरीस राज्यात सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात देखील आपला तडाखा सुरूच ठेवला. मुंबई, पुणे, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असून खरीप हंगामातील पिके बहरली आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामाला वेग दिला आहे.
अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस ब्रेक घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलैमधील दमदार हजेरीनंतर ऑगस्टमध्ये मान्सूनचा पाऊस विश्रांती घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा जवळील कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष पुढील काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल जवळ सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पावासाचा जोर कमी असणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्याला मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. पण सतत कोसळणाऱ्या या पावसाचा फायदाही झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे. १४ जुलै रोजी राज्यातील धरणात सरासरी ३० टक्के पाणीसाठा होता पण आता सतत पडणाऱ्या पावसामुळे १५ दिवसांत धरणातील सरासरी पाणीसाठ्यात तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा बहुतांश जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.