पुसदच्या वसंतनगरात फुटबॉल खेळण्यावरून वाद चिघळला.
मध्यरात्री घरासमोर तिन राऊंड गोळीबार करण्यात आला.
अजिज खान फते खान गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल.
एका संशयिताला अटक, तिघे अजूनही पसार.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील वसंतनगर परिसरात फुटबॉल खेळण्यावरून झालेला वाद चिघळत जाऊन गोळीबारापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत नगर परिसरातील चौथ्या गल्लीमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या या प्रकारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी घरासमोर येऊन थेट बंदुकीतून सलग तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात अजिज खान फते खान हा तरुण जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या वसंतनगर परिसरात तरुणांमध्ये फुटबॉलच्या खेळादरम्यान शाब्दिक वाद झाला. मात्र या हमरीतुमरीच्या वादानंतर वसंत नगर परिसरातील चौथ्या गल्लीमध्ये रविवारी रात्री काही तरुणांनी रात्री थेट एका घराच्या समोर उभे राहून हवेत बंदुकीतून सलग तीन राऊंड फायर केले. या गोळीबारात अजिज खान फते खान हा तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं जात आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले. गोळीबाराच्या आवाजाने नागरिक घराबाहेर पडले, तर काहींनी घरांचे दरवाजे बंद करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला. वसंतनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाणेदार सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. उर्वरित तिघे संशयित अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या घटनेनंतर वसंतनगर परिसरात तणावपूर्ण शांतता झाली आहे. तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. फुटबॉल खेळण्यावरून वाद एवढ्या टोकाला जाईल आणि थेट गोळीबार होईल, यामुळे नागरिकांनी धक्का व्यक्त केला आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये आणि कायद्याच्या चौकटीत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.