
संजय गडदे, साम टीव्ही
सामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाकडून एक खुशखबर. यंदा सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीपूर्वी म्हाडाकडून बंपर लॉटरी जाहीर होणार आहे. राज्यभरात एकूण १९,४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकट्या मुंबईत साधारणपणे ५ हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.
म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना जयस्वाल म्हणाले की, "मुंबईकरांसाठी या वर्षातील पहिली लॉटरी असेल. गोरेगाव, विक्रोळी, बोरिवली, अँटॉप हिल आणि दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये ही घरे असतील."
वरळी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील घरे १५ मेपूर्वी वितरित
या कार्यक्रमात जयस्वाल यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. वरळी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांचे वाटप १५ मेपूर्वीच करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईसह राज्यभरात १९,४९७ सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट
म्हाडाने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळातर्फे एकूण १९,४९७ सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यासाठी तब्बल ९,२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी, मुंबई मंडळअंतर्गत ५,१९९ सदनिकांची उभारणी होणार असून त्यासाठी ५,७४९.४९ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
मागील दीड वर्षात म्हाडाकडून १३ लॉटऱ्या
म्हाडाकडून मागील दीड ते पावणे दोन वर्षांत राज्यभरात एकूण १३ लॉटऱ्या काढण्यात आल्या असून, सुमारे ३०,००० घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. मुंबई मंडळाने या कालावधीत सुमारे ६,००० घरांची लॉटरी काढली होती.
बजेटला प्राधिकरणाची मंजुरी
म्हाडाचा सन २०२४-२५ चा सुधारित आणि २०२५-२६ चा नवीन अर्थसंकल्प नुकताच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. प्राधिकरणाने सन २०२५-२६ साठीच्या १५,९५१.२३ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला तसेच सन २०२४-२५ साठीच्या १०,९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.